नागपूर : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगी आणि दानपेटीतील निधीच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी नागपूर शहर काँग्रेसतर्फे गुरुवारी नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर परिसरात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह करण्यात आला.

रामभक्तांच्या श्रद्धेचा विश्वासघात झाल्याचा आरोप

नागपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या तर्फे गुरुवारी सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील संतरा मार्केट येथील पोद्दारेश्वर राम मंदिर, मेयो रुग्णालयासमोर ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या देणगी व दानपेटीतील निधीच्या कथित गैरव्यवहाराची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या रोख रक्कम, सोने-चांदी आणि अन्य देणग्यांचा गैरवापर झाल्याचा आरोप करत हा प्रकार रामभक्तांच्या भावनांचा विश्वासघात असल्याचे म्हटले. प्रभू श्रीराम हे संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान असून त्यांच्या नावावर जमा झालेल्या निधीबाबत संपूर्ण पारदर्शकता राखली गेली पाहिजे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

भजन, पसायदान आणि सद्बुद्धीची प्रार्थना

सत्याग्रहादरम्यान ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन सादर करण्यात आले. त्यानंतर ‘खरा तो एकची धर्म’ आणि ‘पसायदान’चे सामूहिक गायन करून समाजात सलोखा, सत्य आणि नैतिकतेची भावना दृढ व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली. प्रभू रामाच्या नावावर कथित गैरव्यवहार करणाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी, अशीही प्रार्थना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात सहभागी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पांढरी टोपी आणि गळ्यात दुपट्टा परिधान करून गांधीवादी पद्धतीने सत्याग्रह केला. घोषणाबाजीपेक्षा शांततामय आंदोलनातून भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्यावर भर देण्यात आला.

पोलिसांत तक्रार दाखल करण्याची घोषणा

आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. कथित आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. सत्याग्रहानंतर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, ट्रस्टी अनिल मिश्रा आणि कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.तसेच केंद्र सरकारने या प्रकरणावर मौन न बाळगता वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि श्रद्धेच्या नावावर कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मोठ्या उपस्थितीची नोंद

या सत्याग्रहात शहर काँग्रेसचे पदाधिकारी, फ्रंटल संघटनांचे अध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक, महापालिकेतील पक्षाचे माजी उमेदवार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयूआय तसेच अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी रामभक्तांच्या श्रद्धेचा मान राखण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगत, सार्वजनिक धार्मिक संस्थांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.