नागपूर : नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील सोमवारी (२९ जून) पदभार स्वीकारणार आहेत. त्याबाबत त्यांनी लोकसत्ताला दुजोरा दिला. त्यापूर्वी एका हिंदू संमेलनातील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) विषयी गौरवोद्गार काढल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या संविधाननिष्ठा आणि प्रशासकीय तटस्थतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

वाद नेमका कशामुळे?

विश्वास नांगरे पाटील यांच्या एका हिंदू संमेलनातील भाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या भाषणात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत गौरवोद्गार काढल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यानंतर या भाषणावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

वडेट्टीवार यांनी काय आक्षेप घेतला?

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये “खाकी अंगावर, पण विचार आरएसएसचे?” असा सवाल उपस्थित केला. संविधानाची शपथ घेऊन सेवेत असलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याने अशा कार्यक्रमात सहभागी होणे आणि विशिष्ट वैचारिक संघटनेबाबत सार्वजनिक भूमिका मांडणे सेवा नियमांच्या विरोधात नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

संविधाननिष्ठा आणि तटस्थतेचा मुद्दा काय ?

वडेट्टीवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांची ओळख त्यांच्या वर्दी, कायद्यावरील निष्ठा आणि संविधानाप्रती असलेल्या बांधिलकीतूनच असावी, असे म्हटले आहे. वैयक्तिक विचार आणि अधिकृत जबाबदारी यांच्यात स्पष्ट सीमारेषा राखणे आवश्यक असून, प्रशासनावरील जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय किंवा वैचारिक भूमिकेपासून समान अंतर राखले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

पोलीस प्रशासनाकही भूमिका अद्याप काय ?

या वादावर विश्वास नांगरे पाटील किंवा नागपूर पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणावर ते भूमिका स्पष्ट करणार का, याकडे लक्ष लागले आहे.

सोमवारी पदभार स्वीकारणार

वादाच्या पार्श्वभूमीवर विश्वास नांगरे पाटील सोमवारी नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. या वृत्ताला खुद्द त्यांनीच दुजोरा दिला आहे. कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकाभिमुख पोलिसिंग ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील. मात्र, रुजू होण्यापूर्वीच त्यांच्या भाषणावरून निर्माण झालेला वादही त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच चर्चेचा विषय ठरला आहे.