नागपूर : चाकूचा धाक दाखवून दोन लुटारूंनी कृषी अधिकारी व त्याच्या कुटुंबीयांकडील चार तोळे सोन्याचे दागिने व रोख हिसकावली. ही घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुकेश्वर परिसरातील रेल्वेच्या बोगद्याजवळ घडली. भर रस्त्यात ५ जुलैला दुपारी अडीच वाजता बुटीबोरी बोगद्याजवळ वाटमारीची घटना घडली.

याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. सुशांत चंद्रकांत हजारे ( ५३ रा. चंद्रमणीनगर) असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. सुशांत हे उमरेडमधील तालुका कृषी कार्यालयात साहाय्यक पर्यवेक्षक आहेत.
भर रस्त्यात दुपारी बुटीबोरी बोगद्याजवळ वाटमारीची घटना घडली.

नेमकं प्रकरण काय?

सुशांत हजारे ५ जुलैला नागपूर पासून ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर सदनिका बघायला पत्नी व मुलीसह कारने बुटीबोरी येथे गेले होते. फ्लॅट बघितल्यानंतर दुपारी २.३० वाजता ते कारने नागपूरकडे निघाले. बोगद्याजवळ मोटारसायकलने आलेल्या दोन लुटारूंनी त्यांना अडवले. त्यांच्या गळ्याला चाकू लावून दागिन्यांची मागणी केली. लुटारूने सुशांत यांच्या पत्नीकडील एक लाख २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी व सुशांत यांच्याकडील एक हजार रुपये हिसकावले. मोटारसायकल घेऊन लुटारू पसार झाले.

लुटारू मटकाझरी मार्गे पसार…

सुशांत यांनी परिसरातील नागरिकांना माहिती दिली. एका नागरिकाने वडदमधील नागरिकांना मोबाइलद्वारे कळविले. नागरिकांनी टेबल व दगड लावून रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. लुटारूंना रस्ता अडविल्याचे दिसले. त्यामुळे ते मटकाझरी मार्गाने पसार झाले.

ग्रामीण पोलिसांकडून सात टीम

दरम्यान घटनेची पोलीस तक्रार दाखल होताच ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींच्या शोधासाठी सात टीम तयार केल्या आहेत. या सर्व घटनाक्रमाचा व्हिडिओ त्यांच्या मुलीने कॅमेरात कैद केला असून तो व्हायरल झाला आहे. त्यानुसार आरोपींचा शोध ग्रामीण पोलीस घेत आहेत.