नागपूर: सोशल मीडियावर रोख रक्कम दाखवत श्रीमंतीचा व्हिडिओ पोस्ट करणे नागपुरातील एका व्यावसायिकाला महागात पडले. व्हिडिओ पाहून त्याच्याच मित्रांनी घरफोडीचा कट रचला. तब्बल ७५ घरफोड्यांचा अनुभव असलेल्या एका अट्टल चोरट्याला सोबत घेत सात जणांनी मिळून सुमारे ८ लाखांचा ऐवज चोरला. त्यानंतर चोरीतील रक्कम अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्याचा संशय आल्याने आरोपींनी पुन्हा ४० लाखांच्या खंडणीसाठी फोन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
नेमके प्रकरण काय आहे?
नागपुरातील मॅक्स ग्लोरी स्टोरी परिसरात राहणारे व्यावसायिक समीर यासलवार यांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचा मित्र श्रेयस बोरकर याने इतर साथीदारांसह घरफोडीचा कट रचल्याचा पोलिसांचा तपास आहे.
आरोपींनी चोरीची तयारी कशी केली?
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी सर्वप्रथम फिर्यादीच्या कारला मोबाईल लावून त्यांच्या घराचे लोकेशन मिळवले. त्यानंतर ‘पोंग्या’ दाभणे याला सोसायटीत पाठवण्यात आले. त्याने घराची काच कापून आत प्रवेश केला. घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने गोळा करून ते खाली उभ्या असलेल्या साथीदारांकडे फेकले आणि मुख्य दरवाजातून बाहेर पडला.
किती ऐवज चोरीला गेला?
या घरफोडीत सुमारे ४ लाख ५० हजार रुपये रोख आणि सुमारे ४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा जवळपास ८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
चोरीनंतर खंडणीचा फोन का आला?
या गुन्ह्यात सात आरोपी सहभागी होते. मात्र चोरीनंतर मुद्देमाल दोन आरोपी घेऊन पसार झाल्याने इतर आरोपींना वाटले की, त्यांना कमी रक्कम मिळाली. सोशल मीडियावरील व्हिडिओत मोठी रक्कम दिसत असल्याने घरात अजूनही मोठा पैसा असल्याचा त्यांचा समज झाला. त्यामुळे त्यांनी समीर यासलवार यांना ४० लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन केला, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी तपास कसा उलगडला?
चोरी आणि त्यानंतर आलेल्या खंडणीच्या फोनमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र चोरीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आणि तपासाची दिशा निश्चित केली.
आतापर्यंत कोणाला अटक झाली आहे?
बेलतरोडी पोलिसांनी या प्रकरणात पोंग्या दाभणे आणि अक्षय लोखंडे या दोघांना अटक केली आहे. उर्वरित पाच आरोपींचा शोध सुरू असून त्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके काम करत आहेत.
पोलिसांनी काय सांगितले?
या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर यांनी प्रसिध्दी माध्यमां’शी बोलताना दिली.
