नागपूर : शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चिंताजनक बनली आहे. मालमत्ता दलालाकडून दोघांची ४१ लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली. दुसरीकडे हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचे प्रकरण उघड झाले. याचदरम्यान पोलिसांनी कारवाई करत दोन ड्रग्ज तस्करांना जेरबंद केले. शहरात घरफोड्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ
निकाहच्या वेळी १२ तोळे सोन्याचे दागीने, ५ लाख रुपये रोख देऊनही मोहम्मद नूर आलम यांची कन्या सहेर बानो यांचा लोभी पती, सासू आणि मामाने १० लाखांच्या हुंड्यासाठी छळ केल्याचा संतापजनक प्रकार तहसील पोलीस हद्दीत उघडकीस आला.
सतत पैशाची मागणी, मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने केलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी पती मोहम्मद नूर आलम, सासू नसिम बानो फारूक कुरैशी आणि मामा मुश्ताक अहमद या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सहेर बानो यांचा निकाह मावशीचा मुलगा मोहम्मद नूर आलम मोहम्मद फारूक कुरेशी (४० , रा. हिदवाई नगर, कानपूर) याच्याशी झाला होता. सख्ख्या भाचीचा छळ केल्याने नात्यांमधील विवाह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मालमत्ता दलालाकडून ४१ लाखांचा गंडा
बेलतरोडीत भुखंड खरेदी- विक्रीच्या व्यवसायाची दलाली करणाऱ्याने दोघांची ४१ लाखांनी फसवणूक केली. मोहन भरतराम तावडे (४१) आणि त्यांचे मेहुणे महेश चिंतामण क्षीरसागर अशी फसवणूकीला बळी पडलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करायची इच्छा होती. ते जागा शोधात असताना प्रदिप भाऊराव शेंडे (५८) याच्याशी त्यांची ओळख झाली. मोहनने दोघांचीही गरज ओळखून २६ जानेवारी २०२० ते २६ जून २०२० या चार महिन्यांच्या कालावधीत अनेक जागा दाखवल्या. त्यापैकी तावडे यांना बेलतरोडीत भुखंड क्रमांक १७ साठी प्रदिपला २० लाख रुपये दिले. तावडे यांच्या मेहुणे महेश क्षिरसागर यांना शिल्पा सोसायटीतील मनिष नगरातल्या सदनिकेसाठी २१ लाख दिले. मात्र ६ वर्षे झाली तरी मोहनने मालमत्तेची नोंदणी करून दिली नाही.
मेफोड्रेन ड्रग्ज तस्कर अटकेत
ऑपरेशन थंडर अंतर्गत पाचपावली पोलिसांनी वैशालीनगरातील कोलकाता रेल्वे लाईनजवळ दोन अंमली पदार्थ तस्करांना १३ ग्रॅमच्या मेफोड्रेन ड्रग्जसह अटक केली. शेख आदिल शेख रसीद (३३, रा. भालदारपूरा), आषिष सागर रामटेके (३४, रा. कामठी) अशी या अंमली पदार्थ तस्करांची नावे आहेत. या दोघांकडे पोलिसांना १३ ग्रॅम मेफोड्रेन अंमली पदार्थ आणि दोन भ्रमणदूरध्वनी सापडले.
एमआयडीसीत पुन्हा घरफोडी
एमआयडीसी पोलीस हद्दीतील महाजनवाडी येथे अकरम मोहम्मद खान (४७) यांचे घर फोडत कपाटातील रोख ७२ हजार रुपये, दागीने असा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. खान हे घराला कुलूप लावून कुटुंबासह नातेवाईकाच्या साक्षगंध कार्यक्रमासाठी वर्धा जिल्ह्यातल्या शिरपूर येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी परत आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला.
तांब्याची तार चोरणारा गजाआड
मेडिकल परिसरातील इमारतींमध्ये बसवलेल्या वातानुकुलीत यंत्रांमधील तांब्याची तार चोरून ती काळ्या बाजारात विक्री करणाऱ्याला अजनी पोलिसांच्या पथकाने गजाआड केले.
