नागपूर : विश्वास नांगरे पाटील पोलीस आयुक्त म्हणून दाखल झाल्यानंतर त्यांनी गुंडांना कायदा हाती घ्याल तर सोडणार नाही, असा दम दिला होता. मात्र त्यांच्या इशाऱ्यानंतरही उपराजधानीत हत्याकांडाचे सत्र थांबेनासे झाले आहे. भांडेवाडीत कुख्यात गुन्हेगाराची तर कामठीत महिलेची गुरुवारी एकाच दिवशी हत्या आल्याने शहर हादरले आहे. पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यावंतर सलग चार खून झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
गणेश प्रेमलाल बोरकर (४०) असे भांडेवाडीत आणि भाग्यश्री अशी कामठीत खून झालेल्यांची नावे आहेत.
गुंडाची गुंडांनीच केली हत्या…
भांडेवाडी परिसरात मारला गेलेला गणेश हा कुख्यात असून, याच्याविरुद्ध खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई झाली होती. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास गणेश हनुमाननगर भागात होता. याचवेळी तीन ते चार युवकांनी गणेशवर वार केले. गणेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मारेकरी पसार झाले. दरम्यान एका नागरिकाने भांडेवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गणेशला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जुन्या वैमनस्यातून त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस परिसरातील मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
लिव्हईनमधील महिलेची हत्या….
तर नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गादा गावाजवळील फार्म हाऊस परिसरात गुरुवारी रात्री भाग्यश्री नावाच्या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. धारदार शस्त्रांनी वार करुन भाग्यश्रीची हत्या झाल्याचे समोर आले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. भाग्यश्री या पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर एकासोबत लिव्ह इनमध्ये राहत होत्या. दीड महिन्यापूर्वी त्याच्यापासूनही भाग्यश्री यांनी फारकत घेतली होती.
