नागपूर : शहरात २२ मे २०२६ पर्यंत तब्बल ३९१ घरफोडीच्या घटना घडल्या. मात्र यापैकी केवळ ९१ गुन्ह्यांचा तपास पोलीस लावू शकले. म्हणजेच सुमारे ३०० प्रकरणांतील चोरटे अजूनही मोकाट फिरत आहेत.परिणामी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ही ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे, गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नेमलेला पोलीस ठाण्यांतील गुन्हे शोध विभाग तपासाऐवजी कारकुनी कामात अडकला आहे. गुन्हे तपास अधिकारी आणि कर्मचारी टेशन डायरी, अहवाल, बंदोबस्त, ई साक्ष, व्हीआयपी ड्युटी आणि प्रशासकीय कामांमध्ये जुंपली जात असल्याने घरफोडीसारख्या गंभीर गुन्हयांच्या तपासावर परिणाम होत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे तपास यंत्रणेचे तीन तेरा वाजल्याची चर्चा पोलीस दलातच दबक्या आवाजात सुरू आहे.

अनुभवींना डावलून नवख्या कर्मचाऱ्यांवर तपासाची जबाबदारी टाकली जाते. दुसऱ्या बाजूला महापालिका आणि मेट्रो प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्चून शहरात उभारलेले ४ हजारांहून अधिक कॅमेरे शोभेची वस्तू बनले आहेत. यापैकी ७५ टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.

क्राईम डायरीच्या नोंदीनुसार गेल्यावर्षी २२ मे २०२५ पर्यंत घरफोडीचे ३८५ गुन्हे नोंदले गेले होते. यंदा हा आकडा वाढून ३९१ वर पोहोचला. चोरट्यांनी उन्हाळी सुट्टीत बाहेरगावी गेलेल्या कुटुंबांची घरे लक्ष्य केली. विशेष म्हणजे, २०२५ या संपूर्ण वर्षात १००५ घरफोड्या झाल्या होत्या. त्यामुळे सध्याचा वेग पाहता यंदा हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. घरफोडीच्या ३९१ घटनांपैकी फक्त ९१ गुन्हे उघडकीस आल्याने उघडकीचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सीसीटीव्ही नेटवर्क, तांत्रिक तपास आणि गुन्हे शाखेच्या पथकांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात घरफोडी रोखण्यात आणि आरोपी पकडण्यात पोलिसांना यश मिळत नसल्याची टीका होत आहे.

सर्वाधिक घरफोड्या कळमना, पारडी आणि वाठोड्यात

वाठोडा, कळमना, यशोधरानगर आणि पारडी ही चार पोलीस ठाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ चारच्या परिघात येतात. या भागात सर्वाधिक कष्टकरी कामगार राहतात. मात्र घरफोड्यांचे प्रमाण शहरात याच भागात अधिक आहे. या एकट्या हद्दीत घरफोड्यांच्या आकडा शतक ओलांडून पुढे सरकला आहे. मात्र त्यापैकी फक्त २५ घरफोड्यांची उकल पोलीसांचा गुन्हे शोध विभाग करू शकला आहे.

घरफोडीच्या तपासाचा वेग मंदावल्यात वास्तव आहे. तो वाढवण्यासाठी ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकाला तांत्रिक आणि कारकुनी कामातून शिथिलता देण्यासाठी अभ्यास केला जात आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करता तपासात अनुभवींकडून मदत घेतली जाईल. मनपाच्या सीसीटीव्ही यंत्रणेतील बहुतांश कॅमेरे बंद असल्यानेही तपासाला खीळ बसत आहे. – राजेंद्र दाभाडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)