नागपूर : शहरात खासगी सावकारी आणि मालमत्ता व्यवहाराच्या आडून सुरू असलेल्या आर्थिक शोषणाचा धक्कादायक प्रकार रविवारी सक्करदरा परिसरात उघडकीस आला. गरजेपोटी घेतलेल्या तीन लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात अवैध सावकारी आणि दमदाटी करणाऱ्या दोन भामट्यांनी एकाकडून पाच पट म्हणजेच तब्बल १५ लाख रुपये वसूल केले. एवढ्यावरच ते शांत राहिले नाहीत तर आणखी पैशांची मागणी करण्यासाठी त्यांनी घरावर गुंड पाठवून धमक्याही दिल्या.

सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणात कमलेश गणपतराव हनोते (४२) याला अटक केली असून त्याची कथित ठगबाज आणि अवैध सावकारी करणारी साथीदार अनिता पूरनलाल भारद्वाज फरार आहे.

नेमकी घटना काय घडली…

मोहित मिलिंद पारधी (२४) यांनी मार्च २०२५ मध्ये कमलेश हनोते याच्याकडून ४८ लाख रुपयांत भुखंड खरेदीचा व्यवहार केला होता. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी ३० लाख रुपये दिले. मात्र, दस्त नोंदणी न करता कमलेशने पैसे स्वतःकडेच ठेवले. काही महिन्यांनंतर पारधी यांना व्यवसायासाठी रोख रकमेची गरज होती. त्यामुळे पारधी यांनी आपली रक्कम परत मागितली. याच क्षणापासून त्यांच्या अडचणींची मालिका सुरू झाली.

अवैध सावकारीच्या जाळ्यात अडकवले…

पैसे परत देण्याऐवजी कमलेशने त्यांची ओळख अनिता भारद्वाज हिच्याशी करून दिली. ती दरमहा दहा टक्के व्याजाने कर्ज देते, असे कमलेशने पारधी यांना सांगितले. पारधी यांनी सुरुवातीला एक लाख रुपये घेतले. ते व्याजासह परतही केले. नंतर जुलै २०२५ मध्ये पारधी यांनी पुन्हा अनिताकडून तीन लाख रुपये घेतले. दरम्यान कर्जाची परतफेडीस करण्यास विलंब झाला. त्यानंतर या अवैध सावकारांचा खरा चेहरा समोर आला.

घरावर गुंड पाठवून जीवे मारण्याची धमकी

या जोडीने पारधी यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली. शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती आणि घरावर गुंड पाठवून कुटुंबाला धमकी देखील दिली. घाबरलेल्या पारधी यांनी तीन लाखांच्या बदल्यात १५ लाख रुपये दिले. एवढी रक्कम मिळूनही हे दोघे खंडणीची मागणी करतच होते. अखेर त्रस्त पारधी यांनी सक्करदरा पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी कमलेश हनोतेला अटक करत अवैध सावकारी आणि धमक्यांच्या जोरावर पैसे उकळणारे टोळी कार्यरत आहे का, याचा तपास सुरू केला आहे. यात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.