नागपूर : राष्ट्रीय महामार्गावर दोन दिशांना झालेल्या अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले. तर यात ९ जण गंभीररित्या जखमी झाले. चिंताजनक बाब म्हणजे यातील एक अपघात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा झाला. तर रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी गेलेल्या खासगी प्रयोगशाळा कर्मचाऱ्याला सुरक्षा रक्षकानेच अमानुष मारहाण केल्याचा प्रकार मेडिकलमध्ये घडला.

कायदा हाती घेतला जात असल्याने एकीकडे नागरिक सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला असतानाच महिलांच्या बाबतीत मात्र एक दिलासा देणारी घटना समोर आली. कपिलनगरात महिलेशी आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या आरोपीव विरोधात पोलिसांनी अवघ्या १४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

मेडिकलमध्ये अमानुष मारहाण

नातेवाईकाने केलेल्या विनंतीमुळे मेडिकलमध्ये भरती रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी गेलेल्या खासगी प्रयोगशाळा कर्मचाऱ्याला एमएसएफच्या सुरक्षा रक्षकांनी अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. सराईत गुन्हेगाराप्रमाणे एमएसएफ जवानांनी त्याला मणक्याचे हाड मोडेपर्यंत मारहणा केली. मिलिंद अशोक राजगुरू (२६, हनुमाननगर) असे जखमीचे नाव आहे. मिलिंद हे दोन दिवसांपूर्वी मेडिकलमध्ये दाखल रुग्णाच्या नातेवाईक महिलेने मदत मागितल्याने रक्ताचे नमुने घेण्यासाठी गेले होते. दरम्यान एमएसएफचा सुरक्षारक्षक अंकित अरविंद पांडे यांनी मिलिंदच्या कानशिलात लगावली. त्याला ओढत कार्यालयात नेले.तेथील जवानांसमोर एमएसएफ अधिकारी प्रमोद बबनराव नेऊलने फायबरच्या स्टिकने मिलिंदचे पाय, पाठ, खांद्यावर प्रहार केले. मिलिंदच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पुन्हा कॅफेच्या आड हुक्का

गोकुळपेठेतील कॉफी हाऊस चौकातील सोल कॅफेच्या आड सुरू असलेला हुक्का पार्लर पोलिसांनी उधळला. ग्राहकांना प्रतिबंधीत तंबाखूजन्य फ्लेवर पुरवल्याबद्दल ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी कॅफेचा मालक रितेश देवेंद्र आमले (३७), सार्थक बाबाराव पखाले (१९), कॅफेतील ग्राहक तुषार किसन घरडे (२०) आणि पीयूष गोपाल तोडसन (२४) विरूद्ध गुन्हा दाखल केला. या परिसरात कॅफेच्या आड मध्यरात्रीनंतर हुक्का पार्लरचा गोरखधंदा सुरू असतो. मात्र, काही ठिकाणी पोलिसांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे काही हुक्का पार्लर्समध्ये तर कारवाई झाल्यावर २४ तासांच्या आत परत तोच प्रकार सुरू होतो.

रस्ता अपघातात दोघांचे मृत्यू

सावनेर मार्गावरी हेटी चौकीजवळ दुचाकीस्वाराला टिप्पर ट्रकची धडक बसली. तर जबलपूर महामार्गावरील हिंदुस्थान सावजी ढाब्या समोर खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस धावत्या ट्रकवर पाठीमागून आदळली. या दोन्ही अपघातात दुचाकीस्वार आणि बसचालक जागीच दगावले. देवराव सिताराम बारापात्रे (५०) असे सावनेर मार्गावर झालेल्या अपघातातील मृताचे नाव आहे. देवराव हे पत्नी लताबाई (४५) यांना घेऊन सावनेरवरून खापा येथे जात होते.

पाटणसांवगी येथील पोलीस चौकीजवळ यू-टर्न घेत असताना नागपूरकडून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी दाम्पत्याला उपचारासाठी नेताना देवराव यांचा मृत्यू झाला. तर लताबाई बारापात्रे यांनाही डोक्याला व पायाला गंभीर मार लागला आहे.
हुडकेश्वर पोलीस हद्दीतील बाह्यवळण मार्गावर तेलंगणा येथील मोहम्मद इमरान वल्द मोहम्मद सामी (३७) हे खासगी बसमध्ये प्रवासी घेऊन मध्य प्रदेशकडे निघाले होते. दरम्यान मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास बाह्यवळण मार्गावर त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. खासगी प्रवासी बस धावत्या ट्रकला जोरदार धडकली. यात चालकाच्या दिशेने बसचे केबीन ट्रकच्या मागील भागात घुसले. त्यात चेंगरले गेल्याने मोहम्मद इमरान सामी जागीच दगावले.

विनयभंगाच्या गुन्ह्यात १४ तासांच्या आत दोषारोपपत्र

कपिलनगरात संजय कडू ले आउट येथील १८ वर्षिय महिलेशी आक्षेपार्ह वर्तन करणारा वैभव गणेश ब्रम्हे (२६) याच्या विरोधात पोलिसांनी अवघ्या १४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

महिलेची व्यथा न्यायालयासक्ष येणार असल्याने तिला कायदेशीर दाद मिळण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे. घटना घडल्याच्या अवघ्या १४ तासांत कपिलनगर पोलिसांनी न्यायवैद्यक विभागाच्या मदतीने पुरावे गोळा केले. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि ई साक्ष नोंदवून घेत पोलिसांनी ही प्रकरण वेगाने न्यायमंदिरापुढे सुनावणीसाठी सादर केले.