नागपूर : गेल्या २४ तासांत शहर आणि परिसरात झालेल्या तीन भीषण रस्ते अपघातांमध्ये पाच जणांना प्राण गमवावे लागले. बेलतरोडी, कळमना आणि सावनेर पोलीस हद्दीत या घटना घडल्याने पाच कुटुंबांमध्ये शोककळा पसरली. ६ महिन्यांपूर्वी कपीलनगरात खून करून पसार दोन मारेकाऱ्यांसह दोन दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या दरोडा टाकणाऱ्या आणखी एकाला क्राईम युनिट दोनच्या पथकाने अटक केली. दुसरीकडे आयपीएलच्या हंगामात क्रिकेट सट्टा बुकिंना दणका देत नागपूर सायबर पथकाने पुण्यात बसलेल्या १२ बुकींची झडती घेतली.

पाच अपघाती मृत्यूंनी हळहळले नागपूर

रस्ते अपघाताची सर्वांत गंभीर घटना बेलतरोडीत घडली. रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने दुचाकीवरून घरी निघालेले विजय सावरकर आणि त्यांची पत्नी सुरेखा सावरकर या दोघांना चिरडले. मनिषनगर ते बेसा मार्गावरच्या मेडप्लस औषधालयासमोर रात्री साडेबाराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या पंकज बाळकृष्ण डोकाटे याने घरी जात असलेल्या पती- पत्नीला पाठीमागून चिरडले. कारचालक डेकाटे एका बँकेचा व्यवस्थापक आहे.

उभ्या ट्रकला धडकली दुचाकी, दोघे गतप्राण

विवाह समारंभ आटोपून विजयनगरकडे निघालेले दुचाकीस्वार रस्त्याच्या मध्यभागी उभ्या आयशर ट्रकवर धडकले. कळमना पोलीस हद्दीतील लक्ष्मीनगर चौकातल्या लाल शाळेजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. यात सुरज रात्रे (२२) आणि बलवंत वंजारे (५०) यांचा उपचारांसाठी नेताना मृत्यू झाला. सावनेर मार्गावर कला वाणिज्य महाविद्यालयाकडून ओव्हरटेक करत असताना ट्रकच्या धडकेत कोठीराम केशव चाफेकर यांचा मेडिकलच्या ट्रॉमामध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला.

खुनाच्या दोन आरोपींसह दरोडेखोर जाळ्यात

कपिल नगर येथे १५ ऑक्टोबरला म्हाडा कॉलनीत राजेश ओरेकर यांचा खून करून पसार झालेले मारेकरी कल्पेश सुरज राभा (२२) आणि निपिन उर्फ हनी दीपक ठाकूर (२६) गुन्हेशाखा पथक दोनच्या हाती लागले. याच पथकाने गिट्टीखदानमधील फरार दरोडेखोर साहिल उर्फ लक्की संजय ढोके (१९) याला जेरबंद केले.

लक्कीसह आठ जणांच्या दरोडेखोर टोळीने गिट्टीखदान पोलीस हद्दीत दिवसाढवळ्या गडपायले यांच्या मुलाला चाकूचा धाक दाखवत ४० हजारांची रोख लुटली होती. या टोळीतील पाच जणांना यापूर्वीच गुन्हे शाखेने दाभा येथून अटक केली.

नागपूर पथकाची पुण्यात सट्टा बुकींची चौकशी

आयपीएल क्रिकेट सट्टाच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सायबर शाखेने उलगडा केला. त्यानंतर ४२ जणांची बँक खाती गोठवली गेली. याच प्रकरणात सायबर शाकेच्या विशेष पथकाने पुण्यात १२ जणांची चौकशी केल्याची माहिती आहे.
ठगाने उघडलेल्या खात्यांमध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील बुकींची नावे समोर आली असून याचे केंद्र मुंबई आणि पुण्यात असल्याचे आढळले.

निवृत्त ज्येष्ठ महिलेला गंडवले

सौर उर्जा प्रकल्पासाठी सरकार मोठ्या प्रमाणत सबसीडी देते. एकदा हा प्रकल्प कार्यान्वित झाला, की रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे वीज आणि पैशाची बचतही होईल, असे आमिष दाखवत वर्धा जिल्ह्यातील ठगबाजाने ज्येष्ठ महिलेच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत तीन लाखांचा गंडा घातला. दर्शन रवींद्र सिरसोडे (३३, रा. सिंदीमेघे, वर्धा) असे या ठगबाजाचे नाव आहे.

दोन महिन्यांपासून फरार वाहनचोर अटकेत

दीपक लाँड्री समोरून दोन महिन्यांपूर्वी हिरोहोंडा अॅक्टिव्हा चोरणाऱ्याला बजाजनगर पोलिसांनी चोरीच्या वाहनासह ताब्यात घेतले. मनिष रामगोपाल जोशी (४०, रा. स्वामी समर्थ सोसायटी, हुडकेश्वर) असे दुचाकी चोराचे नाव आहे. मनिषने बजाजनगर पोलीस हद्दीतून ११ फेब्रुवारीला ही दुचाकी चोरली होती.