नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात गुन्हेगारी आणि दुर्दैवी घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. एका हवाई सुंदरीच्या आत्महत्येने खळबळ उडाली असताना अपघाती मृत्यूंचे सत्र सुरूच आहे. लक्ष्मी नगर परिसरात भर दिवसा चोराने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हद्दपार गुंडाने शहरात पुन्हा घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हवाई सुंदरीची गळफास लावत आत्महत्या
कुटुंबाकडून विवाहासाठी तगादा लावला जात असल्याने तणावात आलेल्या हवाई सुंदरीने गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लकडगंज परिसरात शनिवारी उघडकीस आली. लकडगंज परिसरातील सुखवस्तू कुटुंबात माखोरे पॅलेस येथे ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गायत्री उर्फ गौरी राजेंद्र बनसोड (२८) असे सदनिकेतच शुक्रवारी मध्यरात्री अडिचच्या सुमारास आत्महत्या केलेल्या हवाई सुंदरी तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायत्रीचे वडील राजेंद्र हे हॉटेल व्यावसायिक आहेत. हवाई सुंदरी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर गायत्री एका विमान कंपनीतीही सेवा देत होती. दरम्यान तिची एका डॉक्टर तरुणाशी ओळख झाली.
दोघांमध्ये प्रेम झाले. गायत्रीने कुटुंबाला डॉक्टर तरुणाबद्दल माहिती दिली. कुटुंबाचा देखील तिच्या प्रेमाला विरोध नव्हता. मात्र कुटुंबाकडून विवाहाचा आग्रह धरला जात असल्याने गायत्री तणावात होती. दरम्यान कुटुंबिय शुक्रवारी सायंकाळी भंडारा येथे नातेवाईकांकडे गेले. रात्री दोनच्या सुमारास गायत्रीने डॉक्टर मित्राला भ्रमणदूरध्वनीवरून संपर्क केला. बोलता बोलता आक्रमक झालेल्या गायत्रीने आपण जीव देणार असल्याचे सांगितले. तो गायत्री रहात असलेल्या घरी पोचला. मात्र ती दरवाजा उघडत नसल्याने डॉक्टर तरुणाने लगेच कुटुंबियांना माहिती दिली. रात्री अडिचच्या सुमारास कुटुंबिय पोचल्यानंतर पोलिसांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला असता ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह खाली उतरवून मेयोत रवाना केला.
भरदिवसा मंगळसूत्र हिसकावले
शहरातील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या लक्ष्मीनगरात पाठलाग करणाऱ्या चोराने महिलेच्या गळ्यातील मौल्यवान मंगळसूत्र हिसकावले. जैन मंदिराजवळ शनिवारी सकाळी ९. ३० च्या सुमारास ही घटना घडली. अनुपमा शिरास (७८) या काही कामानित्त शेजारी जात होत्या. काळ्या रंगाच्या दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या सोनसाखळी चोराने अनुपमा यांना एकटे गाठले. पाठीमागून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत त्याने पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू केली आहे.
सावनेर मार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू
रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा तोल जाऊन तो देखील खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन, दुचाकीस्वाराचाच मृत्यू झाला. खापरखेडा पोलीस हद्दीतील सावनेर मार्गावरच्या पाटणसावंगी येथे मुख्य मार्गावर ही घटना घडली. राजकुमार गोविंदलाल काकानी (६५, रा. सरस्वती अपार्टमेन्ट, धरमपेठ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तिलक रामूलाल यादव (३५, रा. पाटणसावंगी) हे बाबूळखेडा मार्गाने पायी घरी जात होते. खरे टाऊन येथील रहिवासी काकानी यांच्या दुचाकीची यादव यांना पाठीमागून धडक बसली. दरम्यान काकानी हे स्वतः खाली पडून गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, डॉक्टरांनी काकानी यांना तपासून मृत घोषित केले. यादव यांना मेयोत हलवण्यात आले.
लकडगंजमध्ये साडेतीन लाखांची घरफोडी
लकडगंज पोलीस हद्दीतील सतरंजी पुरा येथील मामा गल्लीत अर्शिया रफीक खान (४६) यांचे घर फोडून चोरट्यांनी लोखंडी आलमारीतील रोख तीन लाख तसेच सोन्याचे मौल्यवान दागीने दागिने असा साडेतीन लाखांचा एवज लंपास केला. खान या पती व मुलांसह घरात झोपलेल्या असता, चोरट्याने मागील खोलीतील टिनाचे पत्रे सरकावून ही घरफोडी केली.
हद्दपार गुंडाची शहरात घुसखोरी
शहर आणि ग्रामीणच्या परिघातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्यानंतरही शहरात घुसखोरी करणारा गुंड प्रज्वल उर्फ धम्मा अनिल बागडे (२४, रा. रमाबाई चैक, आंबेडकर नगर) याला वाडी पोलीसांनी पुन्हा जेरबंद केले. धम्मा हा वाडी नगर पालिकेच्या बसस्थानकाजवळ दिसल्याची कुणकूण वाडीच्या गुन्हे शोध पथकाला लागली होती. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. धम्मा याला पोलिसांनी १२ नोव्हेंबर २०२४ ते १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत हद्दपार केले होते. तो आदेश धुडकावून धम्मा शहरात दिसल्याने पोलिसांनी त्याला जेरबंद करत मनाई आदेश उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला.
