नागपूर : भांडेवाडी परिसरातील रेल्वेस्थानकाजवळ गुरुवारी कुख्यात गुंड गणेश उर्फ गुरुदेव बोरक याचा खून झाला. त्याचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले. गणेशच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच भाडोत्री मारेकऱ्यांमार्फत एक लाखांमध्ये ही हत्या घडवून आणल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीसांचा तपास पोहोचला आहे.
वेगळे राहूनही पत्नीला त्रास
या हत्याकांडात मारला गेलेला गणेश कुख्यात अपराधी आहे. त्याच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहे. गुन्हेगारी वृत्तीत सुधारणा होत नसल्याने पोलिसांनी त्याच्यावर स्थानबद्धतेची प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली होती. तरीही त्याच्या कृत्यांमध्ये सुधारणा होत नव्हती. तो सतत त्रास देत असल्याने मनिषा त्याच्यापासून वेगळी रहात होती.
हत्येसाठी विकले दागीने
भांडेवाडी पोलिसांनी याचा तपास सुरू केला, तेव्हा समोर आलेली माहिती धक्कादायक होती. ज्या व्यक्तीची क्रूरपणे हत्या झाली, तो सराईत गुंड होता. या गुंडाचा कायमचा काटा काढण्यासाठी कोणत्याही बाहेरच्या शत्रूने नव्हे, तर त्याच्या स्वतःच्या पत्नीने म्हणजेच मनीषा बोरकर हिनेच भाडोत्री मारेकऱ्याला एक लाख रुपयांची सुपारी दिली. यासाठी तीने स्वतःचे दागीने देखील विकले. यातून मिळालेल्या पैशातून तीने हे सुपारी दिली.
पहिल्या पतीच्या दोन मुलींवरही नजत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बोरकर दारूच्या पुरता आहारी गेला होता. तो रोज मनीषाचा छळ करत होता. घराबाहेर पाऊल टाकल्ले तर तो मनिषाला जीवे मारण्याची भीती द्यायचाा. मनीषाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. त्यांच्यावरही गणेशची वाईट नजर होती, त्यामुळे मुलींच्या भीतीपोटी मनिषानेच हे धाडस केले.
लग्न सोहळ्यात फुटला संयमाचा बांध
कन्हान येथे अलिकडेच एक कौटुंबिक विवाह सोहळा झाला होता. तिथे भर लग्न समारंभात उपस्थित नातेवाईकांसमोर गणेशने मनिषाला ला बेदम मारहाण केली. सर्वांदेखत झालेल्या या अपमानामुळे मनिषाच्या संयमाचा बांध फुटला. तो आपल्याला संपवेल आणि मुलींचेही लैंगिक शोषण करेल, या भितीपोटी मनिषा त्याच्या गुंड वृत्तीमुळे वैराच्या शोधात होती.
अखेर शत्रू सापडला
गणेश हा गुंड वृत्तीचा होता. त्यामुळे परिसरात त्याने अनेक वैरी निर्माण केले होते. आपला कट प्रत्यक्षात आणण्यासाठी तिला भाडोत्री मारेकऱ्यांचा शोध होता. हा कट तडीस नेण्यासाठी मनीषाला अमन उर्फ नाटो पप्पू कैतवार याची माहिती मिळाली. तिन स्वतःचे दाहीने विकून गणेशला संपवण्यासाठी एक लाखांची सुपारी दिली. यातली अर्धी रक्कम तिने अमनला लगेच दिली.
डोळ्यांत मिर्ची पावडर टाकून हल्ला
अमन उर्फ नाटो पप्पू कैतवार आणि त्याचा साथीदार अभिजीत उर्फ ददू साखरे यांनी मिळून गणेश याच्या हालचालींवर पाळत ठेवली. गुरुवारी तो भांडेवाडी रेल्वे स्थानक जवळ येताच त्यांनी गणेशच्या डोळ्यांत मिर्ची पावडर फेकली. त्यानंतर गणेशवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या भयंकर हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
खुनाची कबूली
हत्येची माहिती मिळताच भांडेवाडी पोलिसांनी पंचनामा करून सीसीटीव्ही तपासले. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस मनिषापर्यंत पोहोचले. पोलिसांनी ताब्यात घेताच तिने गणेशच्या हत्येची कबूली देत घटनाक्रम सांगितला. या गुन्ह्यात मनीषा बोरकर आणि अभिजीत उर्फ ददू साखरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, मुख्य मारेकरी अमन उर्फ नाटो पप्पू कैतवार आणि आणखी एक साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
