नागपूर: नंदनवनमध्ये घडलेल्या प्राणघातक हल्ल्यातील जखमीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटकही करत नाही तोच हत्याकांडाची आणखी एक घटना घडली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिनी माता नगरात सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावावर चाकूने हल्ला करत गुरुवारी सकाळी त्याचा जीव घेतला. मोहन चिंताराम बांते ( २१) असे धाकटा भाऊ समीर चिंताराम बांते(१९) याने केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मोठ्या भावाचे नाव आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात हत्याकांडाची ही मालिका सुरूच असताना पोलीस आयुक्तांसमोर रोज नवे आव्हान निर्माण होत आहे.

घटनेची पार्श्वभूमी नेमकी काय….?

मोहन व समीर हे सख्खे भाऊ आहेत. मोहन हा नेहमी आई कुमारीबाई आणि वडील चिंतामन यांना पैशासाठी त्रास देतो. त्यांना शिवीगाळ करतो व पैशांसाठी मारहाण करतो, याचा समीर ला राग होता. बुधवारी त्याची आई कामावरून घरी आली तेव्हा मोहनने पुन्हा आईशी वाद घातला. दरम्यान समीर तिथे आला. मोहनचे हे नेहमीचे झाले आहे असे ओरडत समिरने बुधवारी सायंकाळी सहा वाजता मोहनशी भांडण केले. यात समीरने मोहनवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले . त्याला का मेयोत दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच मोहनचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. वैद्यकीय सुचनेनंतर पोलिसांनी सख्खा भाऊ समीर बांते विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिसांनी समीरने हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे.

नंदनवन खूनी हल्ल्यातील जखमी दगावला…

पोलीस दल ईदच्या बंदोबस्तात गाफील असताना नंदनवन परिसरात बुधवारी रात्री सात जणांनी चौघांवर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी अक्षय वंजारी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी वंदना लांजेवार, प्रदीप आखरे, प्रशांत आखरे, सूरज लांजेवार या चौघांना अटक केली. या घटनेनंतर पोलीस सावधही होत नाहीत तोच कळमनात हत्याकांड घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.