नागपूर : Nagpur Crime News Updates : पत्नीवर पतीने केलेला जीवघेणा हल्ला, अंबाझरी बायपासवरच्या जिंजिस कॅफेवर झालेली कारवाई, दोन मित्रांमध्ये झालेली मारहाण आणि बलात्कार प्रकरणात गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना हव्या असलेल्या कुख्याताला झालेली अटक मंगळवारी नागपूर शहरातल्या गुन्हे विश्वात चर्चेचा विषय ठरली.

१. पत्नीवर चारित्र्याचा संशय, कोयत्याने वार

सदर पोलीस हद्दीत चारित्र्याचा संशय घेऊन पतीने मंगळवारी सकाळी पत्नीवर चाकू, कोयत्याने हल्ला केला. मोहन नगरातील लाला बगीचा येथील शिवशंकर मंदिराजवळ ही घटना घडली. आदित्य रमेश उईके (२५) रा. पांढराबोडी, राम नगर असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. आदित्यने पत्नी गुनगुन हिच्यावर हा हल्ला केला.

गरोदर असल्याने पत्नी बाळंतपणासाठी २ महिन्यांपूर्वी मोहननगरात माहेरी आली होती. बाळंत झाल्यावरही ती सासरी येत नसल्याने आदित्य तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. मंगळवारी त्याने याच कारणावरून चाकूने हल्ला करत जखमी केले. गुनगुनला चेहरा, गळा आणि डोक्यावर जखमा झाल्या आहेत. तिच्यावर मेयोत उपचार सुरू आहेत.

२. कॅफेच्या आड हुक्का पार्लर

अंबाझरी परिसरातील अमरावती मार्गांवर राजसोसपणे कॉफी हाऊसच्या आडून सुरू असलेला हुक्का पार्लर पोलिसांनी उधळून लावला. जिंजिस कॅफेवर छापा टाकत अंबाझरी पोलिसांनी कॅफेचा संचालक निखील प्रदीप गावंडे (२२) रा. रामनगर याला दणका दिला. त्याच्या कॅफेमधून पोलिसांनी ११ हजार रुपये मुल्याचा प्रतिबंधित तंबाखू, हुक्का, गांजासाठी वापरल्या जाणाऱ्या चिलीम असा मोठा मुद्देमाल जप्त केला.

३. दोन मित्रांमध्ये जीवेघेणा हल्ला

या घडामोडीत नंदनवन परिसरातील हसनबाग येथे शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन तरुण मित्रांमध्ये जीवघेणी मारहाण झाली. यात शेख बशीर शेख (२०) याने घराजवळच राहणारा मित्र शहबाज खान अनवर खान (१८) याच्यावर चाकूने हल्ला केला. जखमी शहबाजला रुग्णालयात दाखल करत पोलिसांनी हल्लेखोर शेख बशीर विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

४. बलात्कार प्रकरणातल्या कुख्याताला अटक

मानकापूर पोलिस हद्दीत ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर बळजबरीने अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या कुख्यात राजा गौस याला पोलिसांनी अखेर अटक केली. गेल्या अनेक महिन्यांपासून हा कुख्यात पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो ठिकाणे बदलत रहात होता. गुन्हेशाखा पथक पाचचे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या टीमने त्याला कळमना पोलीस हद्दीतील म्हाडा क्वार्टर परिसरातून अटक केली.

५. लग्नसमारंभात दागिने लंपास करायचे, पोलिसांनी टोळीचा केला भांडाफोड

गेल्या वर्षभरात विविध लग्नसमारंभ आणि मंगल कार्यालयांमध्ये चोरट्यांच्या टोळींकडून वधू-वर पक्षाकडील नातेवाईकांच्या बॅगा लंपास होण्याचे प्रकार अचानक वाढले होते. अशा लग्न समारंभातून चोरट्यांनी तब्बल २० लाखांच्या वर मुद्देमाल लंपास केला. या आंतरराज्यीय टोळीचा यवतमाळ पोलिसांनी छडा लावून १९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यातून एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेवून सहआरोपींची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.