नागपूर : कंत्राटदाराने हक्काची मजुरी बुडवल्याच्या रागातून संतापलेल्या खाण कामगाराने थेट दोन जिवंत डिटोनेटर (स्फोटके) आणि ठेकेदाराचा भ्रमणध्वनी चोरून पळ काढला. ही दोन जिवंत डिटोनेटर्स स्फोटके खिशात बाळगून रेल्वेने नागपूर गाठणाऱ्या या आरोपीला नागपूर पोलिसांनी आजमशहा चौकातून बेड्या ठोकल्या आहेत.
राजेंद्र रामलाल विश्वकर्मा (३५, रा. बालोद, छत्तीसगड) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील ‘वेस्टर्न कोल फिल्ड’च्या खाणीत मजुरी करत होता. काम करूनही कंत्राटदाराने मजुरीचे पैसे न दिल्याने राजेंद्र संतापला होता. याच रागातून त्याने खाणीतील अत्यंत संवेदनशील असलेले दोन जिवंत डिटोनेटर आणि कंत्राटदाराचा भ्रमणध्वनी चोरला. अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये हे जिवंत स्फोटक खिशात ठेवून त्याने थेट रेल्वेने नागपूर गाठले.
नागपुरात भ्रमणध्वनी विकताना अडकला जाळ्यात
वरोरा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नागपूर पोलिसांना तातडीने सतर्क केले. आरोपीचे मोबाईल लोकेशन ट्रॅक करत लकडगंज पोलिसांच्या पथकाने आजमशहा चौकात सापळा रचला. चोरलेला मोबाईल एका दुकानात विकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला दणका देत ताब्यात घेतले. झाडाझडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून ३ भ्रमणध्वनी आणि २ जिवंत डिटोनेटर जप्त करण्यात आले. घटनास्थळी तातडीने ‘बॉम्ब शोध व नाशक पथकाला’ पाचारण करण्यात आले. बॉम्ब शोधक व नाशक पथक आजमशहा चौकात दाखल होताच, परिसरात खळबळ उडाली. तपासणीअंती ते दोन्ही डिटोनेटर अत्यंत धोकादायक आणि जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. ही स्फोटके सुरक्षेच्या कारणास्तव पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था (पेसो) संस्थेकडे सुरक्षितरित्या सुपूर्द करण्यात आली आहेत.
घातपाताचा कट? एटीएस आणि पोलीस ॲक्शन मोडवर!
जिवंत स्फोटके थेट रेल्वेतून नागपूरपर्यंत आणल्याने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात केवळ मजुरीचा राग होता की त्यामागे कोणता मोठा घातपाताचा कट होता? हे डिटोनेटर कोणाला पुरवले जाणार होते? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दहशतवाद विरोधी पथकाने पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे.
