नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १५ वर्षीय मुलगी ट्युशनला जातो म्हणून घरून बाहेर पडली. पण परतलीच नाही. मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी तिचा शोध घेतला असता ती इंदूरमधील एका झोपडपट्टीत आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.
३ जून रोजी मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी प्राथिमक तपास केला असता ती होशंगाबाद (म.प्र)मध्ये गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक तेथे पोहचले असता ती अजमेर (राजस्थान)मध्ये गेल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथे पोहचले. ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासले तेव्हा मुलगी जयपूर व तेथून इंदूरला गेल्याचे सांगण्यात आले. इंदूरला पोलिसांनी एका झोपडपट्टीत १४ तास या मुलीचा शोध घेतल्यावर ती एका झोपडीवजा घरात सुरक्षित आढळून आली. तिला ताब्यात घेऊन पथक नागपूरला पोहचले. तिचे समुदेशन करण्यात आले. त्यानंतर पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तपासात दाखवलेल्या सातत्यामुळे मुलगी सुखरूप घरी येऊ शकली. एमआयडीसी पोलिसांचे मुलीच्या पालकांनी आभार मानले.
वृद्धाच्या हातून भ्रमणध्वनी हिसकावणारे जेरबंद
पहाटे फिरायला गेलेल्या वृद्धाच्या हातून भ्रमणध्वनी हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.धरमपेठमधील मालविका अपार्टमेंटमधील रहिवासी सुधाकर मोरे (८०) हे २२ मे रोजी पहाटे फिरायला गेले असता रामदासपेठ परिसरात त्यांच्या मागून दुचाकीने आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावला व पळ काढला. मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला व तपास सुरू केला. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासून संशयित आरोपींचा शोध सुरू केला. जुनेद अखतर (१९) रा. मोठा ताजबाग आणि आणि शेख शहाबाज फारुक शेक (२०) रा. ताजबाग या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
अंबाझरीत घरफोडी
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजयनगरमधील रहिवासी अशिवन उमरे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख रुपये रोख आणि सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज पळवला. घटेच्या दिवशी उमरे एका कार्यक्रमानिमित्त रात्री बाहेर गेले होते. त्यावेळेत चोरट्यांनी डाव साधला.