नागपूर : जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी भावाला अटक करण्याबाबत पोलिसांना टीप दिल्याच्या संशयातून एका तरुणावर पाच जणांनी चाकू आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोरांनी तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याला आधी जखमी केले. तो काहीच हालचाल करू शकत नसल्याचे दिसताच त्याच्यावर शस्त्रांनी हल्ला चढवला. अश्विन उर्फ सोनू अमित रहांगडाले (३२) असे जीवघेण्या चाकू हल्ल्यात जखमी तरुणाचे नाव आहे. अश्विन आणि त्याच्या मित्रांवर वंदना लांजेवार, प्रदीप आखरे, प्रशांत आखरे, सूरज लांजेवार आणि इतर ३ साथीदारांनी एका मद्यालयासमोर हा जीवघेणा हल्ला केला.

घटनेची पार्श्वभूमी नेमकी काय…?

अश्विन हा एका वाहनावर चालक म्हणून काम करतो. त्याचे लांजेवार कुटुंबासोबत जुने भांडण आहे. दरम्यान २१ ऑगस्ट रोजी सूरज लांजेवार याचा भाऊ आकाश याला पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. यासाठी अश्विनने पोलिसांना टीप दिली. त्यामुळेच आकाशला पोलिसांनी अटक केली. असा सुरजचा अश्विनवर संशय होता. याच रागातून मंगळवारी त्याने “तू पोलिसांची मुकबिरी केलीस, त्यामुळेच माझा भाऊ अटक झाला. आता मी तुझा आणि अक्षयचा जीव घेईन,” अशी धमकी देत त्याने अश्विनवर हल्ला केला.

‘सोमरस मद्यालयाजवळ’ जीवघेणा थरार….

घटनेच्या काही वेळेपूर्वी अश्विनहा २५ ऑगस्टला सायंकाळी सातच्या सुमारास मित्र अक्षय वंजारी, अतुल शेंडे, मुकेश सनकाडे, पियुष लोणारे, पंकज कुशवाहा व पियुष ठाकूरसह ‘द प्रिझम’ इमारतीतल्या ‘सोमरस मद्यालयात’ मद्य प्राशन करत होता. दरम्यान पत्नीचा दूरध्वनी आल्याने अक्षय वंजारी इमारती खाली आला. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या वंदना लांजेवार हिने अक्षयच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यानंतर प्रदीप आखरे, प्रशांत आखरे, सूरज लांजेवार आणि इतर ३ साथीदारांनी अक्षयवर हल्ला चढवला.

महिलेने डोळ्यांत फेकली मिरचीची पूड….

धाव घेत अक्षयने मित्रांना आवाज दिला. त्यानंतर सर्वजण खाली आले. यावेळी प्रदीप आखरे याने लोखंडी हत्याराने अक्षयवर वार केले, तर प्रशांत आखरे याने अक्षयच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर चाकूचा वार केला. सूरज लांजेवार व इतर साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. अश्विन मध्यस्थीसाठी गेला असता हल्लेखोरांनी त्याच्यावरही चाकू हल्ला केला. जखमी अक्षयला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणात हल्लेखोर सूरज लांजेवार, वंदना लांजेवार, प्रदीप आखरे, प्रशांत आखरे व ३ अनोळखी अशा एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.