नागपूर : आधीच वयोमानाने थकलेल्या जन्मदात्याच्या ओढीने घरी निघालेला अभियांत्रिकी शाखेच्या प्राध्यापकाचे आयुष्य एका कारचालकाच्या चुकीमुळे अक्षरशः उध्वस्त झाले. त्याहून अधिक वेदनादायक ठरले ते अपघातानंतर त्याच्या वडिलांच्या नशिबी आलेला वनवास. मुलाच्या अपघाती निधनानंतर शोकाकुल कुटुंबाला आधार देण्याऐवजी पोलिसांनी हद्दीचे कारण समोर केले. त्यामुळे नातेवाइकांना अक्षरश: पायपीट करावी लागत आहे.
चुकीच्या दिशेने कार थांबवत चालताने अचानक दरवाजा उघडल्याने गंभीर जखमी झालेले अभियांत्रिकीचे प्राध्यापक मृत्यूशी दिलेली झुंज हरले. इथून सुरू झाली कुटुंबाची फरफट. अपघातानंतर कुटुंबीयांना ‘अपघात नेमका कुठे झाला?’ या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तीन पोलिस ठाण्यांत पायपीट करावी लागली. मृत्यूनंतर ‘एमएलसी’ची प्रक्रिया संथपणे करून खासगी इस्पितळानेही त्यात भर घातली.
तुषार हेमचंद्र जोशी (४२) रा. जुनी कामठी असे मृताचे नाव आहे. तुषार हे १० फेब्रुवारीच्या रात्री, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयातून घरी जात होते. कामठी मार्गावरील हॉटेल ओयो हायवे इनच्या प्रवेशद्वाराजवळ एमएच ३४ बीएफ १५४३ या क्रमांकाची कार उभी होती. कारचालकाने आधीच चुकीच्या दिशेने रस्त्यावर कार उभी केली होती. त्याने अचानक दरवाजा उघडला.
त्यामुळे मर्यादित गतीमध्ये गाडी चालवत असतानाही जोशी त्यावर थेट धडकले व जखमी झाले. त्यांना तत्काळ कामठीतील आशा रुग्णालयात नेण्यात आले. पण, अपघात स्थळ कुठे व कुठल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत? हा प्रश्न कुटुंबीयांसाठी दुःस्वप्न ठरला. कुटुंबाला एका पोलिस ठाण्यातून दुसऱ्या तिथून तिसऱ्या तिसऱ्या पोलिसांची उंबरठे झिजवावे लागले. मुलाची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू असताना, कुटुंब प्रशासनाशी झुंजत होते.
‘हे आमच्या हद्दीत नाही’ या नवीन कामठी व कपिलनगर पोलिस ठाण्यातील थंड, कोरड्या उत्तरांनी कुटुंबाच्या वेदनांवर मीठ चोळले गेले. शेवटी वरिष्ठ पत्रकार मनीष कुळकर्णी यांनी जोशी यांच्या नातेवाइकांसह आशा रुग्णालयात जाऊन सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारचालकाचा शोध लावला. पोलिसांना क्रमांक, नंबर जुनी कामठी पोलिस ठाण्यात जाऊन दिले. त्यानंतर उपनिरीक्षक सागर भंडारी यांन कारचालक अमरेश मेस्त्री सापडला. तोदेखील शिक्षकच आहे. त्याने नंतर अपघाताचे स्थळ सांगितले. दरम्यान, सीम्स इस्पितळात उपचार सुरू असतानाच तुषार जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला.
दवाखान्यातूनदेखील संथ प्रक्रिया
जोशी यांच्या मृत्यूनंतर ‘एमएलसी’ची प्रक्रिया राबविण्यासाठी ‘सीम्स’मधून बजाजनगर पोलिस ठाण्याला कळविणे आवश्यक होते. मात्र, ६० हजारांचे बिल राहिले आहे. या कारणामुळे पोलिसांना अगोदर कळविण्यात आले नाही. सकाळी नातेवाइकांना पैसे भरल्यानंतर दोन तासांनी रिपोर्ट पाठविण्यात आला. पोलिसांनीदेखील इतक्या विलंबाबाबत आश्चर्य व्यक्त केले.

