गिट्टीखदान येथे हनुमान जयंती शोभायात्रा पाहण्यासाठी गेलेला शाळकरी मुलगा अथर्व नानोरे याचा अपहरणानंतर शनिवारी मृतदेहच सापडला. या खुनाच्या घटनेचा अद्याप उलगडा झालेला नसताना प्रतापनगरातही दोन शाळकरी मुले घरातून निघून गेली. त्यामुळे मुलांच्या अपहरणांच्या घटनां मागे नेमका काय प्रकार आहे, याचे गुढ वाढत आहे.
हा घटनाक्रम घडत असताना फुटाळा तलावात नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केली.
प्रतापनगरातून शाळकरी भावंडे बेपत्ता
अभ्यासावरून आईने रागावल्याचा रुसवा मनात धरून आदित्य अमित मेश्राम ( १६) आणि त्याचा लहान भाऊ प्रथमेश अमित मेश्राम (१२) ही भावंडे शनिवारी सायंकाळी घरातून निघून गेली.
या मुलांचे वडील अमित हे परिसरात खासगी काम करतात. तर त्यांच्या पत्नी विनिता या त्रिमूर्ती नगरात दत्त मंदिर भागातील भवन शाळेजवळ घरकामे करतात. आदित्य आणि प्रथमेश ही त्यांची दोन्ही मुले प्रतापनगर पोलीस हद्दीतील सोमलवार शाळेत शिकतात. ही भावंडे अभ्यासात लक्ष घालत नसल्याने आई विनिता या मुलांच्या काळजीपोटी अभ्यास करण्यास सांगत होत्या.
मुलांना अभ्यासाला बसा असे सांगून त्या शनिवारी दुपारी कामावर गेल्या. सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी बराच वेळ वाट पाहिली. शेजारी विचारले. सायंकाळी सायकलवर निघून गेल्याचे कळल्याने मुले खेळायला गेली असावीत म्हणून त्यांनी पुन्हा काही वेळ वाट पाहिली. रात्रीचे साडे आठ वाजले तरी मुले घरी आली नसल्याचे चिंतेत आलेली आई विनिता (३९) यांनी प्रतापनगर पोलीस ठाणे गाठले.
गिट्टीखदानमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतापनगर पोलिसांनी गांभीर्य ओळखत तातडीने तपास पथकाला सतर्क केले. पथकाने परिसर पिंजून काढत सीसीटीव्ही फुटेजही तपासणे सुरू केले आहे. ज्या ठिकाणावरून मुले सायकवरून जाताना दिसली त्या बाजूच्या सर्व दिशांना पोलीस मुलांचा शोध घेत आहेत.
फुटाळा तलावात तरुणाची आत्महत्या
कसल्यातरी नैराश्यातून अंदाजे ३५ वर्षे वयाच्या तरुणाने शनिवारी दुपारी फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. उन्हामुळे तलाव परिसरात शुकशुकाट असताना दूरवर उभ्या तरुणांनी एकाला तलावात उडी घेताना पाहिले. त्यांनी आरडाओरड करत लगेच अग्निशमक विभागाला भ्रमणदूरध्वनीवरून माहिती दिली. पथकाने तडक घटनास्थळ गाठत तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर तलावात बुडालेल्या तरुणाला बाहेर काढले.
मृताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस गेल्या काही दिवसांत बेपत्ता म्हणून नोंद असलेल्यांची पाहणी करत आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या उजव्या हातावर ‘कमला’ हे नाव गोंदलेले आहे. सक्षम राऊत यांच्या सुचनेवरून अंबाझरी पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
.
हिंगणात पुन्हा हिट अँड रन
हिंगणा पोलीस हद्यीतील समृध्दी सर्कलकडे जाणाऱ्या मार्गावर अनोळखी वाहनचालकाने दिलेल्या जोरदार धडकेत पद्मावती उर्फ रिंकू धनंजय पांडे (४५, रा. गुमगाव, हिंगणा) यांचा जागीच मृत्यू झाला. पद्मावती या आपल्या अॅक्टिवा दुचाकीने घरी जात होत्या. वाहन चालकाने भरधाव वेगात त्यांच्या दुचाीकीला धडक देत पळ काढला. पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा दाखल करत धडक देणाऱ्या गाडीचा शोध सुरू केला आहे.
वाडीत घरफोड्या सुरूच
वाडी पोलीस हद्दीतील लाव्हा येथील नवीन विजय हाडके (२७) यांचे घर फोडत चोरट्यांनी झोपण्याच्या खोलीतील कपाटात ठेवलेली १ लाख ७० हजारांची रोख आणि सोन्या-चांदीचे दागीने असा ३ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. हाडके हे शुक्रवारी घराला कुलूप लावून परिवारासह दिघारी येथे मामाच्या घरी वास्तू पूजनासाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर शनिवारी चोरीचा प्रकार समोर आला.
मध्य प्रदेशातील गुंड शस्त्रासह जेरबंद
तहसील पोलीस हद्दीतील बोरीयापुरा येथे शस्त्र घेऊन फिरणाऱ्या इम्रान खान इब्राहिम खान (२५) याची गस्तपथकाने संशयावरून झडती घेतली असता त्याच्याकडे धारदार शस्त्र सापडले. इम्रान हा मुळचा मध्य प्रदेशातील शिवनीतल्या संजय वॉर्डातील रहिवासी असून मजुरीसाठी तो नागपुरात आला होता. पोलिसांनी गुन्हे अभिलेख तपासला असता त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे आढळले. गुन्हा दाखल करून पोलिसानी त्याला जेरबंद केले.
