Crime in Nagpur Latest updates : मुख्यमंत्र्यांचं शहर असणारं नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. याच शहरात राज्याचं दुसरं विधानभवनदेखील असून हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण मंत्रिमंडळ आणि दोन्ही सभागृहातले आमदार नागपुरात तळ ठोकून असतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने नागपूर एक महत्त्वाचं, संवेदनशील शहर मानलं जातं. मात्र, नागपूरमधील गुन्हेगारी घटना या कायमच चर्चेचा विषय ठरतात. त्यातून नागपूरकरांच्या सुरक्षेचा मुद्दादेखील वारंवार ऐरणीवर येत असल्याचं पाहायला मिळतं. बुधवारचा दिवसदेखील नागपूरसाठी अशाच काही घटनांचा ठरला…
१. शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग
खापरखेडा परिसरात १३ वर्षीय शाळकरी मुलीचा पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तणूक करणारा विक्षिप्त तरुण राकेश हजारे (२६) याला पोलिसांनी बुधवारी बेड्या ठोकल्या. राकेश हा खापरखेडा हद्दीतील वॉर्ड क्रमांक १ मध्ये राहणाऱ्या शाळकरी मुलीचा पाठलाग करत होता. तो मुलीला रस्त्यात अडवून तिच्याकडे वारंवार मोबाईल क्रमांक मागत होता. घाबरलेल्या मुलीने आईला हा धक्कादायक प्रकार सांगितला. यानंतर आईने दिलेल्या तक्रारीवरून खापररखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत राकेश हजारेला अटक केली.
२. ओळखीच्या जोडप्याकडून सराफा व्यावसायिकाचा विश्वासघात
मौजा कामठीतील शेतीवर कर्जाचा बोजा चढल्याने ही शेतजमीन कमी दरांत विकायची आहे, अशी बतावणी करत ठगबाज दिलीप नारायण निनावे आणि त्याची पत्नी दर्शना निनावे या दोघांनी इतवारीतल्या सराफा व्यावसायिकाला ३७ लाख रुपयांचा गंडा घातला.
तहसिल पोलीस हद्दीत ईतवारीतल्या मनोज सुभाषराव निनावे (५०) यांचे निनावे ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. तिथे दिलीप निनावे (४८) आणि त्याची पत्नी दर्शना नेहमी यायचे. या ओळखीतून पती-पत्नीने ७ मार्चला मनोज निनावे यांना मौजा कामठी येथे एक शेतजमीन दाखवली. या शेतीवर कर्ज असल्याने ती कमी दरांत विकायची आहे, असे सांगितले.
त्यावर विश्वास बसल्याने, मनोज यांनी आरोपी पती पत्नी दिलीप आणि दर्शना निनावे सोबत शेती खरेदीचा मौखिक करार केला. ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करून घेतला. दोघांनी मनोज निनावे यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एकूण ३७ लाख रूपये उकळले. दरम्यान मनोज निनावे यांनी दस्त नोंदणी करण्याची मागणी केली असता, आरोपींनी टाळाटाळ केली. अखेर त्यांनी तक्रार केल्यानंतर तहसील पोलिसांनी ठगबाज पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला.
३. हिट अँड रनमध्ये २१ वर्षीय तरुणी मृत्यूमुखी
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत साई खानावळ चालवणारे बहीण-भाऊ कामावर जात असताना भरधाव वेगात आलेल्या कारने पाठीमागून धडक दिली. यात भाऊ-बहीण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एम्समध्येच उपचार सुरू होते. यातील जखमी अनामिका संतोष मडावी (२१) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर लहान भाऊ दीपक मडावी (१७) सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. हे दोघेही दुचाकीने डबलसीट एम्स रुग्णालयातील साई कॅन्टीन येथे कामावर जात होते. हिंगणा हद्दीत नॅशनल कॅन्सर रुगणालयाजवळ एच. पी. पेट्रोल पंपासमोर चारचाकी टाटा सफारीने भरधाव वेगाने त्यांच्या दुचाकीस मागून धडक दिली.
४. ट्रकमध्ये लोखंड चढवताना मजूर चाकाखाली चिरडला
लघू उद्योग परिसरात बारा चक्का ट्रकवर लोखंडी साहित्य चढवत असताना ट्रक चालकाने अचानक ट्रक पाठीमागे घेतला. यात उदयभान उमरलाल उईके (२४) रा. डोंगरा, छिंदवाडा, मध्य प्रदेश हे ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने झालेल्या गंभीर दुर्घटनेत दगावले. लकडगंज परिसरातील रहिवासी उदयभान हे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी होते. कामानिमित्त ते नागपुरात मिनीमाता नगरातल्या चिखली येथे राहत होते. ट्रकमध्ये लोखंडी साहित्य चढवत असताना ट्रक चालक मोहम्मद शैफ मोहम्मद शाहिद (४२) याने निष्काळजीपणा करत ट्रक पाठीमागे घेतला. ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली चिरडले गेल्याने उदयभान यांना गंभीर दुखापती झाल्या. नागरिकांनी धाव घेत उदयभान यांना लगेच उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
५. भिशीचे अडीच लाख चोरीला
नंदनवन पोलीस हद्दीतील विलास बापुराव मडावी (३७) यांच्या घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी अडीच लाखांच्या रोख रकमेवर डल्ला मारला. मडावी हे जुनी वाठोडा वस्ती येथील विनय छाजेड यांच्या घरी भाड्याने राहतात. अडचणीच्या काळात कर्ज घेण्याची वेळ येऊ नये म्हणून मडावी यांनी सोडतमध्ये लागलेल्या भिशीची रक्कम कपाटात ठेवली होती. दरम्यान मडावी हे १४ मार्चला मूळ गावी सिंदेवाणी, ता. सावनेर येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. तेथून परत आल्यानंतर चोरट्यांनी रोख रक्कम पळवल्याचे त्यांचा दिसले.
