नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री शहरात असताना मध्यरात्री पोलिसांवर झालेला हल्ला, देवळीकला येथे शिक्षकाकडून विद्यार्थीनीला झालेली अमानूष मारहाण, विजेचा धक्का लागून कामगाराचा झालेला मृत्यू आणि चोरीच्या दोन घटनांनी शहर हादरले. सोबतच बुटीबोरीतल्या अवाडा प्रकल्पात चार महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेत दोन अधिकाऱ्यांवर पोलिसांनी निष्काळजीपणाचे गुन्हे दाखल केले.
यापैकी दिवसभर चर्चेत राहिली ती पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्याची घटना.शहरातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत शुक्रवारी मध्यरात्री भर रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या पाच जणांनी गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षकासह पथकाला धक्काबुक्की केली. सर्वांत सवंदनशील परिसर राज भवनासमोरील मंगळवारी बाजारात मध्यरात्री दिडच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी रात्री हल्लेखोरांपैकी अमितसिंघ परविंदरसिंघ भाटिया, तरणदीपसिंघ परविंदरसिंघ भाटिया, अनमोलसिंग महेंद्रसिंघ भाटिया आणि अशुतोष बिरेवार या चौघांना जेरबंद केले. यात आणखी एक हल्लेखोर जसप्रितसिंघ परविंदरसिंघ भाटिया हा फरार आहे. सदरचेउपनिरीक्षक दर्शन थोरात यांच्या रात्रपाळी पथकासोबत हा प्रकार घडला.
शिक्षकाकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाण
नागपूर : कुही तालुक्यातील देवळी कला येथे इयत्ता चौथीतल्या चिमुरडीला गणिताचे उत्तर चुकल्याच्या कारणावरून शिक्षकाने बेदम मारहाण केली. या प्रकरणी चाइल्ड हेल्पलाईनने तत्परता दाखवत शिक्षकाविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.देवळी कला शाळेत १० मार्चला घडलेला हा प्रकार शनिवारी ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने चव्हाट्यावर आला.
अवादाच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा
नागपूर : बुटीबोरी विस्तारित औद्योगिक वसाहत परिसरात आवादा कंपनीत पाण्याची टाकी फुटुन ६ कामगारांचा मृत्यू झाला होता. तर या दुर्घटनेत ९ कामगार गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी अखेर औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाने (डीश) आपला सविस्तर अहवाल सादर केला. यात कंपनीतील प्रकल्प प्रमुख प्रशांत कोमल अरविंद कुमार आणि गोयल स्टील टाकीचे प्रकल्प प्रमुख राजेश यादव या दोघांच्या निष्काळजीपणावर बोट ठेवण्यात आले.
त्या आधारे पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याने सहा कामगारांच्या मृत्यूला जबाबदार ठरल्या प्रकरणात शनिवारी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. अवादा प्रकल्पात १९ डिसेंबर २०२५ ला पाण्याच्या टाकीचा स्फोट झाला होता. यात डीशने सादर कलेल्या अहवालात आवादा कंपनी प्रकल्प प्रमुख प्रशांत कोमल अरविंद कुमार आणि गोयल स्टिल स्टील टाकीचे प्रकल्प प्रमुख राजेश यादव या दोघांचा हलगर्जीपणा व निश्काळजीपणामुळे सिद्ध होतो, असे नमूद आहे. त्यामुळे बुटीबोरी पोलीसांनी शनिवारी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
ऑटो चालकाचा मृत्यू, सावनेरात रास्तारोको
सावनेर मार्गावर पाटणसावंगी जवळ माळेगाव येथे शनिवारी दुरापी ऑटोचालकाच्या अपघाती मृत्यूनंतर ग्रामस्थांनी दोन तास रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा पहायल्या मिळाल्या. इंद्रजित नत्शूजी निकोसे (५२) असे ऑटोचालकाचे नाव असून त्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी सायंकाळी ४ ते ६.३० च्या दरम्यान अडिच तास रस्त्यावर ठाण मांडले.
अल्पवयीनाच्या मदतीने ज्येष्ठ महिलेला लुटले
नागपूर : सेवानिवृत्त ज्येष्ठ महिला संध्या अनिल डाहरे या १ मार्चला दुपारी सव्वादोनच्या सुमारास प्रतापनगर पोलिस हद्दीतल्या एटीएम सेंटरवरून दहा हजारांची रोख रक्कम काढून घरी जात होत्या. त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने २ जणांनी हातातील रोख व भ्रमणदूरध्वनी असलेली लाल रंगाची बॅग हिसकावुन पळ काढला
दुचाकीच्या धडकेत जखमीचा मृत्यू
नागपूर : रमजान सणानिमित्त सहकुटुंब यशोधरानगरातील बहिणीकडे निघालेल्या मोहम्मद जमील मोहम्मद आरीफ अंसारी (४४) यांचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. कामगार नगर येथील रहिवासी मोहम्मद हे गेल्या शनिवारी ७ मार्चला पत्नी फातिमा आणि मुलगा मोनूला घेऊन बहिणीकडे जात होते.
दोघांना घेऊन आपल्या दुचाकीने कामठी मार्गावरच्या ऑटोमोटिव्ह चौकाकडून जात होते. वळणावर ते दुचाकी वळवत असताना कामठी कडून भरधाव वेगात आलेल्या पल्सर चालकाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात मोहम्मद यांचा उपचारा दरम्यान ट्रामा सेंटर येथे मृत्यू झाला.
विजेचा धक्का लागून मजूर दगावला
नागपूर : बांधकामाला पाणी देण्यासाठी विंधनविहीरीवरील विजेचा पंप सुरू करताना वीज प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने परशुराम मोतीलाल गौर या मजुराचा उपचारासाठी नेत असतानाच वाटेत मृत्यू झाला. नंदनवन पोलीस हद्दीतील नागपूर सुधार प्रन्यासच्या बंद असलेली इमारतीजवळील पडोलिया बिल्डींगचे समोर ही घटना घडली. सकाळी परशुराम बांधकामाला पाणी देण्यासाठी विंधनविहीर सुरू करण्यासाठी गेले. त्याच वेळी वीज प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने ते बेशुद्ध झाले. काही वेळानंतर मजुर तिथे आले असता ते बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसले.
