नागपूर : हिंसक गुन्हेगारीच्या घटनांमध्ये शहरात चिंताजनक वाढ होत आहे. पोलिसांनीच डायरीवर नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या घटनांमधून हे वास्तव समोर येत आहे. दर दिवसाआड शहरात खून, हत्येचा प्रयत्न, टोळीयुद्ध आणि गोळीबाराच्या घटना घडत आहेत. जुन्या वैमनस्यातून जीवघेणे हल्ले होत आहेत. अगदी किरकोळ वादातून क्रूर हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. चालू वर्षात २०२६ च्या पहिल्या आठ महिन्यांत शहरात हत्येच्या प्रयत्नाचे १४७ गुन्हे नोंदवले गेले, गेल्यावर्षी २०२५ मध्ये हीच संख्या १०४ होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात सरासरीने ४३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. दोन वर्षांच्या आकडेवारीतील हा उच्चांकी आकडा आहे.

शहरात जुलैमध्ये जीवघेण्या हल्ल्याच्या १२ आणि ऑगस्टमध्ये २१ घटना नोंदवल्या गेल्या. ही संख्या याच कालावधीतील २०२५ मधील प्रकरणांपेक्षा अधिक आहे. चाकू आणि बंदुकीच्या वाढत्या वापरामुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत भीती वाढली आहे. दुसऱ्या बाजूला शहरात खुनाच्या घटनांची मालिका देखील सुरूच आहे. शहरात चालू वर्षात आतापर्यंत ७० जणांचे खून झाले आहेत. यातील एकमेव समाधानाची बाब म्हणजे गेल्या तीन वर्षांत दरोड्यांच्या घटनांची टक्केवारी मात्र अंशतः घटली आहे. शहरात २०२४ मध्ये दरोड्याची १९३, २०२५ मध्ये ९८ आणि २०२६ च्या पहिल्या आठ महिन्यांत केवळ ६४ प्रकरणे पोलीस डायरीवर नोंद झाली.

टोळीयुद्धातून वाढतात गोळीबाराच्या घटना

वर्चस्वातून शहरात गुन्हेगार टोळ्यांमध्ये तणावाच्या ठिणग्या पडत आहेत. काही दिवसांपूर्वी जुन्या वादातून जगदीश गोखले याने मकोका आरोपी अजय चिंचखेडेवर गोळी झाडली. यात चिंचखेडे बचावला. २५ जुलै रोजी मानेवाडा घाटावर पवन सूर्यवंशीचा खून झाला. गणेशपेठेत भावानेच मित्रांच्या मदतीने २८ वर्षांच्या अक्षय शेटेची हत्या केली. सेमिनरी हिल्स येथे हॉटेलव्यावसायिक चंदन सिरसवारचा खून झाला. जरीपटकात दोन प्रतिस्पर्धी गटांमधील संघर्षामुळे १९ वर्षांचा राजवीर शर्मा मारला गेला. ११ ऑगस्ट रोजी कुख्यात गुन्हेगार शेख अक्रम उर्फ भुरूला कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न झाला. जून महिन्यात महालमध्ये सौरभ घाटेवर गोळीबार आणि नंतर चाकू हल्ला झाला, जुलै महिन्यातील खापरखेडात सराफा व्यापारी, ऑगस्टमध्ये काँग्रेस नगरसेवक शुभाश मोधघरे आणि आता बेलतरोडीत घोटाळपिंपरीत कार्तिक धार्मिकवर गोळीबाराची घटना घडली. त्यावरून टोळ्यांमधील वाद, वैमनस्य किती टोकाला जात आहे, हे दिसते.

गुंडा विरोधी पथक कार्यान्वित झाल्यापासून गुन्हे शाखेने संघटित गुन्हेगारांच्या १० टोळ्यांवर मकोका कारवाई केली आहे. त्यापाठोपाठ सातत्याने गुन्हे करणाऱ्या १२ जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. सण उत्सवाच्या काळात शहरातल्या शांततेला गालबोट लागू नये, यासाठी हा वेग आणखी वाढवला जाईल. – विनीता शाहू, अपर पोलीस आयुक्त (उत्तर)