नागपूर : शहरात खुनाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या मे ते जुलै या तीन महिन्यांतच तब्बल ३२ जणांचा खून झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २४ खून झाले होते. त्यामुळे यंदा या तीन महिन्यांत खुनाच्या घटनांमध्ये आठने वाढ झाली आहे. वर्षाच्या एकूण आकडेवारीतही यंदा आतापर्यंत ५७ खून झाले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ५२ होता.

मे महिना सर्वाधिक रक्तरंजित

यंदाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता मे महिना उपराजधानीसाठी सर्वाधिक रक्तरंजित ठरला. मेमध्ये तब्बल १५ खून झाले. त्यानंतर जूनमध्ये सात, तर जुलैमध्ये आतापर्यंत दहा खून झाले आहेत. म्हणजेच, उन्हाळ्याच्या दिवसांपासून पावसाळ्यापर्यंत शहरात दर काही दिवसांनी खुनाची घटना घडल्याचे आकडे सांगतात.

गेल्या वर्षी मेमध्ये सात, जूनमध्ये आठ आणि जुलैमध्ये नऊ खून झाले होते. त्या तुलनेत यंदा मेमध्येच खुनाच्या घटनांमध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. जूनमध्ये मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत एका घटनेची घट झाली असली, तरी जुलैमध्ये पुन्हा खुनाच्या घटना वाढल्या आहेत.

पोलिसांसमोर हे आहे आव्हान….

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत खुनांच्या संख्येत पाचने वाढ झाली आहे. वर्षाचा निम्म्याहून अधिक कालावधी अद्याप बाकी असताना खुनांचा आकडा वाढत असल्याने आगामी महिन्यांत पोलिसांसमोर हिंसाचाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान आहे.

महिन्याभरात दहा जणांची हत्या

पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्विकारून जेमतेम महिना झाला आहे. त्याच्या कार्यकाळातील पहिल्याच महिन्यात शहरात खुनाने १० चा दुहेरी आकडा ओलांडला आहे. त्यामुळे वाढता खुनांचा आलेख हा केवळ पोलिसांच्या गुन्हेगारी आकडेवारीचा विषय न राहता शहराच्या सामाजिक सुरक्षिततेसाठीही चिंतेचा विषय ठरत आहे.

अशा घडल्या तीन महिन्यांत खुनाच्या घटना –

वर्ष- महिना- खूनाच्या घटना- एकूण
२०२५ : मे – ७ -जून – ८ -जुलै – ९- – ५२
२०२६ : मे – १५ – जून – ७ -जुलै – १० – एकूण – ५७

शहराच्या परिघातील गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी रात्रीच्या गस्तपथकात वाढ झाली आहे. ठाण्यांमधील ३० टक्के पोलीस रात्रपाळीच्या कर्तव्यावर तैनात आहेत. या शिवाय संवेदेनशील भागांत दुपारी पायी गस्त घातली जात आहे. आगामी काळात याचे परिणाम दिसतील.
-राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे)