नागपूर : शहरातील सराईत गुन्हेगार आणि अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने आक्रमक पवित्रा घेत प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका लावला. मात्र, पोलिसांच्या ‘अॅक्शन प्लान’नंतरही गंभीर गुन्ह्यांचा आलेख घसरण्याऐवजी उंचावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चालू वर्षाच्या १० महिन्यांत पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये १८ टक्क्यांची वाढ केली. तरी शहरात गंभीर गुन्हे ७ टक्क्यांनी वाढले. गुन्हेगार पोलिसांच्या कारवायांना जुमानतच नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गुन्हे शाखा पोलिसांच्या डायरीनुसार चालू वर्षातील १५ हजार १२० सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे अस्त्र उलागले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण पोलिसांनी १८ टक्क्यांची वाढवले. मात्र तरीही शहरात वर्ग १ ते ५ अंतर्गत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण ७ टक्क्यांनी वाढले.

शहरात रोज सरासरी २४ गंभीर गुन्हे

चालू वर्षात (ऑक्टोबर अखेर) शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, महिलांवरील अत्याचार, बलात्कार व अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या ७ हजार ५२२ घटनांची नोंद झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ७ हजार १४ होती. याचा अर्थ प्रतिबंधात्मक कारवाया वाढवूनही शहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी होण्या एवजी ५०८ ने अर्थात ७ टक्क्यांनी वाढली. सध्या शहरात रोज सरासरी २४ गंभीर गुन्हे घडतात, असे पोलीसांच्याच नोंदी म्हणतात.

प्रतिबंधात्मक कारवाईत १८ टक्के वाढ….

बेकायदेशीर उद्योगांना लगाम लावण्यासाठी पोलिसांनी गेल्या वर्षी ८ हजार ९५३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कलम लावून कारवाया केल्या होत्या. यावर्षी त्यात वाढ करून ही संख्या ११ हजार२०५ वर नेण्यात आली. अमली पदार्थ आणि अवैध धंदे कायद्यांतर्गत पोलिसांनी चालू वर्षात सप्टेंबर २०२६ पर्यंत ७०२ जणांवर गुन्हे नोंदवले. गेल्या वर्षीची ही संख्या ४३९ होती. जुगार कायद्यांतर्गत पोलिसांनी दाखल गुन्ह्यांची संख्या ६६६ वरून ८०७ पर्यंत वाढवली. दारूबंदी कायद्यांतर्गत पोलिसांनी ३ हजार २८२ गुन्हे नोंदवले तर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गतही २३८३ गुन्हे नोंद झाले. तरीही गंभीर गुन्ह्यांचा टक्का मात्र वाढतच आहे.

खुनाचा आकडा सहाने वाढला

गेल्या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत शहरात ७६ खुनाच्या घटना घडल्या होत्या. यावर्षी २०२६ मध्ये हीच संख्या ८२ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरात ६ गुन्हे वाढले आहेत. याच कालावधीत गेल्या वर्षी खुनाच्या प्रयत्नांची १४५ प्रकरणे नोंदवली गेली होती. त्यातही १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. शहरात कट रचून पडलेल्या दरोड्याच्या घटनांमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत २९ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. घरफोड्या घटना १,९१७ वरून वाढून १,९९७ वर पोहोचल्या आहेत. या खेरीज सप्टेंबर २०२६ अखेर शहरात चोरीच्या १ हजार ३६८ घटना पोलीस डायरीवर नोंदवल्या

महिलांवरील अत्याचाराचा आलेख वाढताच

शहरात महिलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांत ५८ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून सप्टेंबर २०२५ मधील ३९८ घटनांच्या तुलनेत ही संख्या सप्टेंबर २०२६ अखेर ६३० पर्यंत पोहोचली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांमध्येही १५९ वरून १९४ इतकी २२ वाढ झाली. शहरात हुंडाबळी व छळाच्या घटनांमध्ये १७७ वरून १५६ इतकी १२ टक्के घट नोंदवली गेली. नागरिकांसाठी ही एकमेव दिलासादायक बाब ठरली आहे.

काय म्हणाले पोलीस उपायुक्त….

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांच्या भूमिकेवर गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त दिपक अग्रवाल म्हणाले, सराईत गुन्हेगारांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने पोलिसांना हद्दपारी, स्थानबद्धता आणि मकोकासारख्या कठोर प्रतिबंधात्मक कारवायांचा पर्याय निवडावा लागतो. चालू वर्षात हिंसक गुन्ह्यांमध्ये अडकलेले अनेक गुन्हेगार नवखे किंवा अल्पवयीन असल्याचे आढळले आहे. महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी ‘निर्भया पथक’ लवकरच पूर्ण क्षमतेने सेवेत रुजू होईल. आगामी काळात गुन्हेगारीवर निश्चितच अंकुश आणला जाईल.