नागपूर : तंत्रज्ञानाची कास धरल्याने शहर पोलीस दल प्रत्येक कारवाईत हायटेक तपासाचा दावा करत आहे. असे असताना शहरात दुपटीच्या वेगाने घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या भामट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे, या घटनांमुळे नागरिकांची अक्षरशः झोप उडाली आहे. २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक वेगाने वर गेला आहे. चोरट्यांचे धाडस इतके वाढले आहे की, वर्षभरात तब्बल १,३२५ वाहने चोरीला गेली असून ७७५ घरांचे कुलूप फोडण्यात भामटे यशस्वी झाले.हायटेक पोलिसांसमोर भामट्यांनी आव्हान उभे केले असून कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दरमहा ६० हून अधिक घरे फोडली

पोलिसांकडून कडक गस्त आणि तांत्रिक तपासाचे दावे केले जात असतानाच, दररोज सरासरी पाचहून अधिक वाहने चोरली जात आहेत. दरमहा ६० हून अधिक घरे फोडली जात असल्याचे पोलिसांच्या नोंदीवरूनच स्पष्ट होत आहे. वाहन चोरीत ५५% ने तर घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये ३५% ने झालेली वाढ कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

मकोका आणि हद्दपारीत दुपटीने वाढ….

२०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये शहरात गंभीर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, महिला सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाढत्या हिंसक गुन्ह्यांमुळे चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांच्या मकोका आणि हद्दपारीच्या कारवाईत दुपटीने वाढ झाली असली तरी खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार आणि वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांचा आलेख वेगाने वर गेला आहे.

समाधानाची बाब म्हणजे, संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली असून चालू वर्षातील मकोका कारवाई गेल्या वर्षाच्या १ वरून दुपटीने वाढत २५ वर पोहोचली, तर हद्दपारांची संख्या ६२ वरून ८५ वर गेली आहे.

हत्येच्या घडल्या ७६ घटना…

शहरात वाहन चोरीचे प्रमाण सर्वात जास्त असून एका वर्षात तब्बल १,३२५ वाहने चोरीला गेली. खुनाच्या घटना गेल्या वर्षाच्या ७१ वरून यंदा ७६ वर पोहोचल्या आहेत, तर खुनाचा प्रयत्न करण्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या १२२ घटनांवरून वाढून १४७ वर पोहोचले आहे. किरकोळ कारणावरून होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमध्येही ९० इतक्या मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. बलात्काराच्या घटना १५३ वरून १६६ वर गेल्याने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, गैरवर्तनाच्या (३४९) आणि सोनसाखळी चोरीच्या (४२) घटनांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.

काय म्हणाले अधिकारी…?

राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत नागपुरातील शरीरावरील गुन्हेगारीचे प्रमाण निश्चितच अधिक आहे. यामागे अनेक कारणे आहेत. मात्र, रस्ते अपघातातील मृत्यूला काहीसा दिलासादायक आवर घालता आला आहे. अपघाती मृत्यूंच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली असून ३४ जीव वाचवण्यात यश आले आहे असे सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी म्हणाले.