नागपूर : पैसे उसणे देण्यास नकार दिल्याने गुंडांच्या टोळीने मित्राला रेल्वेखाली चिरडून जीवे मारण्याची धमकी दिली. मद्य पाजले नाही म्हणून चौघांच्या टोळीने मित्रावर जीवघेणा हल्ला केला. आदिवासी विभागाचे धान्य स्वस्त दरांत मिळून देतो, असे आमिष दाखवत आठ जणांनी व्यापाऱ्याला गंडवले. बेटिंगच्या नावाखाली शेकडो जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. हा सगळा घटनाक्रम सुरू असताना वारंवार प्राणघातक हल्ले करणाऱ्या चार गुन्हेगारांवर पोलिसांनी मंकोका अंतर्गत बडगा उगारला.

त्यामुळे रामराज्याचा नारा देणाऱ्या भाजपाच्या सत्ता काळात उफाळून येत असलेल्या गुन्हेगारीमुळे उपराजधानीतील कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

पैशावरून मित्रालाच जीवे मारण्याची धमकी

उसणे पैसे देण्यास नकार दिल्याने कुख्यात गुन्हेगार बाबा टायगर आणि त्याच्या तीन साथिदारांनी मनमोहन चंद्रशेखर शर्मा (२५) यांना रेल्वेखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिली. फय्युम शेख (२४), मोनू खान (२३), अम्मू पठाण (२५) अशी या गुंडांची नावे आहेत. मनमोहनने यापूर्वीही तिघांना अनेकदा आर्थिक मदत केली. मात्र त्यांनी पैसे परत केले नव्हते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मनमोहन बालोद्यान परिसरातून घराकडे जात होता. त्यावेळी तिघांनीही त्यांना पोलीस तलावाकडे नेले. पुन्हा उधार पैसे मागितले. त्यावर मनमोहनने यापूर्वी दिलेले पैसे परत दे असे सांगितले. यावर संतापलेल्या मोनूने मनमोहनचा गळा पकडला व जर तू पैसे दिले नाही तर रेल्वे रुळाजवळ नेऊन मारून टाकू, अशी धमकी दिली.

बिअर पाजली नाही म्हणून चौघांकडून मारहाण

बिअर पाजली नाही म्हणून चार जणांनी वाहनचालक सतीश कांबळे याला जबर मारहण करत जखमी केले. मित्रांसोबत पार्टी करत असताना सतिश यांना घरून सिलिंडरसाठी फोन आला. त्यामुळे सतिश घराकडे जात असताना रोशन गणवीर (४०) याने दारू पाज, अशी गळ घातली. सतीशने नकार दिला असता रोशने तीन साथीदारांच्या मदतीने सतीश तसेच त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली.

व्यापाऱ्याला ९ लाखांनी गंडवले

आदिवासी विभागातल्या अधिकाऱ्यांशी ओळख असून दर्जेदार धान्य स्वस्त दरांत मिळवून देतो, असे आमिष दाखवत जणांनी धान्य व्यापाऱ्याला ९ लाख रुपयांचा गंडा घातला. संघर्ष नगरातील शमशुद्दीन उर्फ बबलू वल्द कमरूद्दीन अंसारी यांचा घाऊक आणि किरकोळ धान्य व्यवसाय आहे. त्यांची इम्रान खान वल्द ईस्माईल खान पठाणशी ओळख झाली. इम्रान खाने याने शमशुद्दीन यांना आदिवासी वसतीगृहांना पुरवले जाणारे धान्य कमी किमतीत मिळवून देवू शकतो. असे आमिष दाखवले. दरम्यान त्याने सोहेल बेग लतीफ बेग, आफताब अजीम कुरेशी, रोहीत श्रवण पारधी, विकास विरेंन्द्र साहु उर्फ विकास गजभिये, असलम बेग उर्फ अज्जु वल्द जलील बेग मोघल, शैलेंन्द्र बबनसिंग ठाकुर,रोहीत वंजारी या सात साथिदारांशी ओळख करून दिली. या सर्वांनी संगनमत करत शमशुद्दीन यांना आदिवासी विभागाची कागदपत्रे देवून बनावट करारनामे केले.

ऑनलाईन ठगबाजांची टोळी गजाआड

ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली शेकडो जणांचे बँक खाते तयार करुन कोट्यवधीचा व्यवहार करणाऱ्या सायबर गुन्हेगार टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. रोशन रामप्रसाद प्रजापती, फैजान आसीफ शेख, पीयूष अंनता दुधनकर, अमित ओमेश ठाकरे अशी ठगबाजांची नावे आहेत.
पवन राजेश धनवीज याच्या सतर्कतेमुळे ही टोळी सापडली. पवनची मुख्य आरोपी रोशनशी मैत्री होती. काही दिवसांतच रोशन लाखोंचा व्यवहार आणि पार्ट्यांवर खर्च करत असताना पवनला संशय आला. पवनने विचारणा केली असता त्याने सायबर फसवणुकीतील पैसे असल्याचे सांगितले. पवनने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रोशनच्या घरात छापा घातला असता सीमकार्ड, आधारकार्ड, एटीएम, डेबीट कार्ड सापडले.

प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघांवर मकोका

मंदिराजवळ जुन्या तरुणीच्या नव्या मित्रावर प्राणघातक हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांवर पोलिसांनी पूर्व गुन्हेगारी इतिहासाची पार्श्वभूमी पाहता संघटीत गुन्हेगारी कलम वाढवले.

वैभव अशोक तन्नेलवार, संकेत गुलाबराव वंजारी, तुषार उर्फ तांबा दिलीपराव पळसापुरे, देवेंन्द्र बारापात्रे अशी या चार अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत. प्रिया उर्फ सपना मेश्राम या जुन्या मैत्रिणीने आपल्याशी असलेली मैत्री तोडत नवा मित्र जोडल्याने संपातलेल्या वैभवने नॅव्ही देवेंद्र रामटेके याच्यावर गेल्या आठवड्यात प्राणघातक हल्ला केला होता. या चौघांवर यापूर्वीही नंदनवन, वाठोडा, कन्हान आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल आहेत.