अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका तरुणीचे वस्तीत राहणाऱ्या युवकावर प्रेम जडले. दोघांनी काही दिवसांच्या ओळखीतच प्रेमविवाह केला. काही वर्षानंतर तिचे मिसकॉल आलेल्या दुसऱ्याच एका युवकाशी सूत जुळले. तिने पहिल्याला सोडून दुसऱ्याशी प्रेमविवाह केला. काही दिवसांतच ती पुन्हा तिसऱ्याच्या प्रेमात पडली आणि तिने तिसऱ्याशीच घरठाव केला. प्रेमात दगा मिळाल्याने दुसऱ्या पतीने तिच्या पहिल्या पतीचा शोध घेतला. दोघेही भरोसा सेलला तक्रार करायला आले आणि न्यायाची मागणी करू लागले. त्यांची तक्रार ऐकून आता पोलीसही चक्रावले आहेत.

नेमकं काय घडलं?

धीरज (२५) हा मिस्त्री असून तो नागपूरच्या वाठोड्यात राहतो. ललीता (१८) ही मूळची ग्वाल्हेरची असून मोठ्या बहिणीसह कामाच्या शोधात नागपुरात आली. धीरजची ओळख वस्तीत राहणाऱ्या ललीताशी झाली. काही दिवसांतच त्या दोघांचे सूत जुळले आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी दोन महिन्यातच पळून जाऊन प्रेमविवाह केला आणि संसार थाटला. त्याच्याकडून तिला एक मुलगा झाला.

यादरम्यान तिला पवन (२५ रा. औरंगाबाद) या युवकाचा मिसकॉल आला. त्यातून दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. दोघांचाही एकमेकांशी संपर्क वाढला आणि ती पवनच्या प्रेमात पडली. दोघांचे प्रेमसंबंध वाढले. तिने पवनला नागपूरला बोलावले. त्याला अविवाहित असल्याचे सांगितले. पवनने थेट नागपुरातच काम शोधले आणि तिच्याशी प्रेमविवाह करण्याची तयारी दर्शविली. तिने पती धीरजला गावी जात असल्याचे सांगून पवनसोबत पळ काढला. दोघांनी एका शिवमंदिरात प्रेमविवाह केला. सोनेगावात संसार थाटला.

दुसरीकडे धीरज तिच्या विरहात दारू प्यायला लागला. पुढे काही दिवसांतच ललीताचे इंस्टाग्रामवरून सचिन नावाच्या युवकाशी सूत जुळले. पवन घरी नसताना सचिन तिच्या घरी यायला लागला. तिच्या प्रेमात सचिन फार वेडा झाला. त्याने तिला पळून जाऊन लग्न करण्यासाठी तयार केले. काही दिवस वाट बघून दोघांनीही पळ काढला.

असा झाला घोळ!

ललीताचा दुसरा पती पवनने पहिला पती धीरजचा शोध घेतला. दोघांनीही पत्नीवर हक्क दाखवत तिला शोधण्याचा प्रयत्न केला. ती सचिनसोबत राहत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे दोघेही पत्नीला मिळविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. त्यांना पोलिसांनी भरोसा सेलला पाठवले.

विकासनिधीसाठी लोकांचे खासदार रामदास तडस यांना स्मशानभूमी, लग्नसमारंभात अर्ज

नेमकी पत्नी कुणाची ?

पहिला म्हणतो माझ्याकडून ललीताला मुलगा आहे, त्यामुळे ती माझी पत्नी आहे. तर दुसरा पती लग्नाचे छायाचित्र, पुरावे आणि साक्षीदारांचे दाखले देऊन ललीता माझीच पत्नी असल्याचे हक्क दाखवतो. पोलिसांनी तिला फोन केला असता ती म्हणते की, माझा जीव तिसऱ्यातच गुंतला आहे. आता पोलीस संभ्रमात पडले. या प्रकरणात भरोसा सेलकडून काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur crime story woman cheats three men for marriage pmw
First published on: 05-06-2022 at 16:09 IST