नागपूर: विध्वंसक कृत्यांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण करणारा कुख्यात गुन्हेगार सीटू सिंहची काढलेली धिंड आणि गुंड सचिन उर्फ वांग्या याच्या पोलिसांनी बांधलेल्या मुसक्या उपराजधानीतल्या गुन्हे विश्वाला हादरा देणाऱ्या घटना ठरल्या. हा घटनाक्रम सुरू असतानाच वर्धा मार्गावर वर्दळीच्या वेळी धावत्या कारने पेट घेतल्याचा थरार घडला. अवघ्या काही मिनिटांत या कारची राख होताना अनेकांनी पाहिले.

१. भाजपा वॉर्ड अध्यक्षाच्या हत्येचा सूत्रधार सीटू सिंह

खून, खंडण्या, प्राणघातक हल्ल्यांसारख्या गुन्ह्यांत कुख्यात असलेला सीटू सिंह याची यशोधरा नगरात पोलिसांनी पाच किलोमीटर धिंड काढत त्याची दहशत मोडून काढण्याचा पुढाकार घेतला. महापालिका निवडणकीदरम्यान नोव्हेंबरमध्ये शहरात भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष सचिन साहू यांचा दिवसाढवळ्या खून झाला होता. या खूनात सीटू सिंह मूख्यसुत्रधार होता.

अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनही सीटूच्या वर्तणुकीत कसलीही सुधारणा होत नसल्याने यशोधरानगरचे ठाणेदार संदीप बुवा यांनी त्याला अनेकदा समज दिली. मात्र त्याची विध्वंसक वृत्ती कमी होत नसल्याने परिसरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत होती. यशोधरा नगर पोलिसांनी बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास कांजी हाऊस चौकातून त्यांच्या घरांपर्यंत धिंड काढली. दोरीने बांधलेल्या अवस्थेत चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत पोलिसांनी त्याला पायी फिरवले.

शहर पोलीस दलात गजानन राजमाने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी कुख्यात गुंड संतोष आंबेकर आणि कामठीचा कुख्यात रणजीत सफेलकर या दोघांची अशाच प्रकारे दिवसाढवळ्या धिंड काढत दहशत संपवण्यासाठी पुढाकार घेतला होता.

२. धावती कार पेटली, काही मिनिटांत कोळसा!

अत्यंत गजबजलेल्या वर्धा मार्गावरील जयप्रकाश मेट्रो स्थानकाजवळ उड्डाणपुलावर धावती कार पेटल्याचा थरार घडला. अवघ्या काही मिनिटांतच कारचा कोळसा झाला. कार चालकाने प्रसंगावधान राखत कार बाजूला घेऊन अगदी ऐन वेळी उडी घेतली. त्यामुळे सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. ही स्विफ्ट डिझायर कार पुसद येथील अमजद खान इब्राहिम खान (३२) हे चालवत होते. ते यशोधरा नगरातील रुग्णालयात नातेवाईकाला भेटून गावी परतत होते. सायंकाळी ७:३० च्या सुमारास ते वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर जात असताना कारने पेट घेतला.

कारचालकाने रस्त्याच्या कडेला थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र, त्याच क्षणी कारचे दरवाजे लॉक झाले. त्याने कसाबसा गाडीतून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर लगेचच, आगीचा भडका वेगाने संपूर्ण गाडीत पसरला आणि अल्पावधीतच ती कार पूर्णपणे जळून राख झाली.

३. पाडव्याच्या मुहूर्तावर बजाजचं शोरूम फोडलं, लाखोंचा ऐवज लंपास

हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या पहिल्याच दिवशी सदर पोलीस हद्दीतील कामठी मार्गावरच्या बजाज पाटणी वाहनांच्या शोरूममधून चोरट्यांनी ३ लाख ८५ हजारांची रोख पळवली. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी अगदी मुख्य मार्गावरच्या पाटणी शोरूमचे शटर वाकवून रोखपालाच्या कपाटातील ३ लाख ८५ हजारांची रोकड पळवली. गुढी पाडवा असल्याने सकाळी सुरक्षा रक्षकाला हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी व्यवस्थापकाला दूरध्वनी करून याची माहिती दिली.

४. चोरीचे लॅपटॉप विकत होता भामटा, पोलिसांनी ‘अशी’ केली अटक!

नागपूर शहरातल्या विविध भागांमध्ये सावज हेरत लॅपटॉप, महागडे भ्रमणदूरध्वनी संचाची चोरी करत त्याची परराज्यात विल्हेवाट लावण्यात सराईत असलेल्या चोरट्यांच्या टोळीतील सूत्रधाराला कळमना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. दिलीपबाबू रंगन अय्यास्वामी (२७) रा. वेल्लोर, तमिळनाडू असे या टोळीतील सूत्रधाराचे नाव आहे. त्याचा साथीदार बालाजी गोविंदअप्पा रा. थाटेपल्ली, कर्नाटक हा अय्यास्वामी पकडला गेल्याचा सुगावा लागल्यानंतर खोलीवरून पसार झाला. या सराईत आंतरराज्य चोराकडून पोलिसांनी चोरीचे ३ लॅपटॉप, ६ महागडे भ्रमणदूरध्वनी पोलिसांनी जप्त केले आहेत. विजय नगर देशी दारू भट्टीजवळ एक व्यक्ती खांदयावर काळया रंगाची बॅग घेऊन मोबाईल व लॅपटॉप विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत मुसळे यांना मिळाली. तिथे पोचलेल्या पथकाने दिलीपबाबु अय्यास्वामी याला ताब्यात घेतले. दिलीपबाबू हा तामिळनाडूचा असल्याने त्याला फक्त तमिळ भाषा येत होती.

५. कुख्यात गुंड वांग्या कारागृहात स्थानबद्ध

घरफोडी, दरोडा, खंडणी, अवैध रेती, मद्य तस्करी सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये विध्वंसक वृत्तीचा कुख्यात गुंड सचिन उर्फ वांग्या राकेश कुंभरे (२८) रा. बैल बाजार, दुर्गा चौक, कामठी याला अखेर पोलिसांनी कारागृहात स्थानबद्ध केले. वांग्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २७ घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत. त्याच्या वागणूकीत सुधारणा होत नसल्याने पोलीस आयुक्तालयाने कठोर कारवाई करत त्याला एक वर्ष कालावधीसाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले. सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे