नागपूर : आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या इंधन टंचाईचे सावट आहे. पेट्रोल, डिझेल पासून घरगुती वापराच्या गॅससाठी सर्वत्र हाहाकार आहे. त्याचाच गैरफायदा घेत बेकायदेशीर साठेबाजी करत इंधनाचा कृत्रिम तुटवडा करण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला. गिट्टीखदानमध्ये हल्लेखोर चौघांनी मुलगा सापडला नाही म्हणून चक्क वडिलांवरच हल्ला केल्याची घटना घडली. रामनवमीच्या आदल्या दिवशी रस्ता अपघातांमध्ये तीन दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागले. शहरातल्या शांततेला गालबोट लागू नये,यासाठी पोलिसांना नोंदीवरच्या आणखी ९० गुन्हेगारांना तीन दिवसांसाठी हद्दपार करावे लागले.

बुटीबोरीत डिझेलची साठेबाजी

टंचाई असल्याचे भासवत काळ्या बाजारात इंधनाची विक्री करण्यासाठी प्रत्येकी २० लिटर क्षमतेच्या ५० बरण्यांमध्ये केलेली १९०० लिटर डिझेलची साठेबाजी ग्रामीण पोलिसांनी पकडली. वर्धा मार्गावरील बुटीबोरीत ही साठेबाजी केली जात होती. या प्रकरणात रणजीत बलदेव सिंग ठाकूर (४९), रोशन कन्नूलाल यादव (४०) या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

आणखी सराईत ९० गुन्हेगार हद्दपार

रामनवमी सणाच्या काळात शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, यासाठी पोलीस आयुक्तांनी बुधवारी आणखी ९० गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्याच्या परिघातून तात्पुरत्या कालावधीसाठी हद्दपार केले. यात सर्वाधिक २५ गुन्हेगार हे कष्टकरींची दाट लोकवस्ती असलेल्या यशोधरा नगरातील आहेत. त्या खालोखाल पारडीतील २०, वाठोड्यातील १८, कळमनातील १५ आणि भांडेवाडी पोलीस हद्दीतील १२ गुन्हेगारांचा समावेश आहे.

मुलगा मिळाला नाही म्हणून वडिलांवर हल्ला

जुन्या वादानंतर एकाला ठार मारण्याचा कट रचत घरावर हल्ला केला तरी मुलगा मिळाला नाही म्हणून चौघांनी चक्क वडिलांवर हल्ला चढवला. याची कुणकूण लागताच सतर्क झालेल्या पोलिसांनी वेळीच चौघांच्याही मुसक्या बांधल्या. गिट्टीखदान पोलीस हद्दीतील भीवसेनखोरी येथील गौतम नगरात हा थरार घडला होता.

सुरेश जोहरसिंग चव्हाण (४४) यांच्या मुलाची साहिल प्रविण पाटील (१९), सोहेल उर्फ चिकु सलीम खान (१८) , दिपक लक्ष्मीप्रसाद बिसेन (२३) आणि पवन किशोर वर्धे (१९) या चौघांशी मैत्री होती. मित्रांत कसल्या तरी कारणावरून वाद झाला. त्यानंतर चौघेही मित्राला जीवे मारण्यासाठी त्याच्या घरी धडकले. मात्र तो सापडला नाही. यारागातून चौघांनी सुरेश चव्हाण यांच्यावरच जीवघेणा हल्ला केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत चौघांनाही बेड्या ठोकल्या.

चोराकडे सापडल्या सहा दुचाकी

गुन्हे शाखा पथक चारचे पथक रामनवमी निमित्त हसनबागेत गस्तीवर असताना सी.बी. ट्रीगर दुचाकी सलमान खान शेर खान (३०) हा दुचाकी कवडीमोल दरात विकण्यास तयार असल्याचे दिसले. ताब्यात घेऊन पोलीसांनी चौकशी केली असता त्याने ही दुचाकी चोरल्याचे सांगितले. इतकेच नाही तर अशा आणखी ५ दुचाकी के.डी.के. महाविद्यालय मार्गावरील शितला माता मंदीराजवळच्या झुडपात लपवून ठेवल्याचे दाखवले. त्याने नंदनवन मधून चार आणि वाठोडातून दोन अशा ६ दुचाकी चोरल्याचे मान्य केले.

तीन प्राणांतिक अपघात

रामनवमीच्या आदल्या दिवशी कळमना, कान्होलीबारा आणि मानकापूर परिसरात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागले. कामठी कडून कळमनाकडे येत असलेल्या अहमद खान रशीद खान (४६) यांना धोतरकर किराणा स्टोअर्ससमोर आयशर वाहनाने पाठीमागून धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी होऊन रुग्णालयात नेताना दगावले.

दुसरी घटना कान्होलीबारा येथे घडली.

भाची सोबत खाद्य तेलाला डबा घेऊन कान्होलीबारा ते खडकी प्रवास करत असताना कारच्या धडकेत देवराव नारायण उईके (५५) यांचा मृत्यू झाला. उईके हे भाची अक्षरा सराटे (१२) सोबत घराकडे जात होते. त्यांच्या दुचाकीला वास्तुलॅण्ड डेव्हलपर्स समोर कारचालकाने धडक देवुन पळ काढला. अपघातामध्ये देवराव आणि त्यांची भाची अक्षरा जखमी झाले.

दरम्यान डॉक्टरांनी देवराव यांना मृत घोषित केले. मानकापूर हद्दीत शफी नगर चौकाजवळ ट्रकच्या धडकेनंतर चाकाखाली आल्याने धर्मचंद भय्यालाल शिव यांचा मृत्यू झाला. व्यवसायाने रंगारी धर्मचंद्र हे दुचाकीवरून कामावर जात होते. ट्रक चालकाने दुचाकीला धडक दिली. यात चाकाखाली आल्याने धर्मचंद यांचा मृत्यू झाला. मृताची पत्नी नीतू यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला ताब्यात घेतले.