नागपूर : मित्राच्या गर्लफ्रेंडला समाज माध्यमावरील इन्स्टाग्रामवरून ‘हाय’ असा संदेश पाठवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. तरुणीच्या प्रियकराकडून त्या युवकासोबत त्याच्या दोन मित्रांनाही चोप देण्यात आला. या प्रकरणात गंभीर जखमी युवकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. करण नरेंद्र सोनबापने (१८, हुडकेश्वर) असे जखमी युवकाचे नाव आहे. राहुल शाहु (२० रा जुना नरसाळा), कृष्णा शाहु (१९) आणि लक्की शाहु (१८) अशी आरोपींची नावे आहेत.
नेमकं काय घडलं….
करण सोनबापने आणि राहुल शाहू हे दोघे मित्र आहेत. राहुलने प्रेयसीसोबत करण आणि त्याचा दुसरा मित्र कार्तिक राजेंद्र माडवे यांची ओळख करुन दिली. २८ जूनला कार्तिकने राहुलच्या प्रेयसीला इंस्टाग्रामवर ‘हाय’ संदेश पाठवला. त्यानंतर दोघांत चॅटिंग झाली. ही चॅटिंग राहुलने पाहिली. प्रेयसीने कार्तिक विनाकारण मॅसेज करत असल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या राहुलने कार्तिकचा शोध घेतला. त्याला कार्तिक करणसोबत चौकात दिसला. त्याने कार्तिकला कानशिलात मारुन मॅसेज का केला? याचा जाब विचारला. त्यानंतर मारहाण केली. करणने भांडणात मध्यस्थी केली.
करणचाही पाठलाग करुन मारहाण…
प्रेयसीबाबत अपशब्द बोलल्यामुळे चिडलेल्या राहुल शाहूने कृष्णा शाहू आणि लक्की शाहू यांच्या मदतीने करणचा शोधले. करण हा हसनबागमधून सर्वेक्ष विनोद जांभुलकर(१८ वर्ष) आणि प्रज्वल यादवरावजी गावंडे (२५) यांच्यासोबत दुचाकीने जाताना दिसला. त्याचा राहूलने पाठलाग केला. सोमवारी मध्यरात्री न्यू ओम नगरात त्यांना गाठले. कार्तिकची बाजू का घेतली? असा जाब विचारुन करणला चोप दिला. अन्य दोन मित्रांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
