नागपूर : बनावट आयपीओ, रोखे बाजारातील गुंतवणूक आणि ऑनलाईन गेमचे आमिष दाखवत देशभरातील गुंतवणूदरारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सायबर शाखेने उलगडा केला. देशभर धुमाकूळ घालणारा या फसवणूक प्रकरणातला ‘मास्टरमाइंड’ आरोपी हा नागपुरातील असून उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने त्याला उपराजधानीतून अटक केली. अनुराग अरविंद श्रीवास्तव असे अटकेतील मास्टरमाईंडचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लखनऊ सायबर पोलिस ठाण्यात कोट्यवधींच्या सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

पोलीस दलातील सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेनंतर आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर लखनऊ येथे नेण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मानकापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश कालसेकर यांनीही यूपी एसटीएफने नागपुरातून आरोपीला ताब्यात घेतल्याची पुष्टी केली. मात्र या संदर्भातली कोणतीही अधिकृत सविस्तर माहिती उत्तर प्रदेशच्या विशेष कृती पथकाने दिलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काय होती मोडस ऑपरेंडी….?

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, समाजमाध्यमांवरील, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून हा ठगबाज रोखे बाजार व आयपीओमध्ये प्रचंड भरघोस मिळवून देण्याचे आमिष दाखवत होता. इच्छुकांना प्रथम व्हॉट्सॲप गटात जोडून बनावट ट्रेडिंग टिप्स, खोट्या नफ्याचे स्क्रीनशॉट आणि दिशाभूल करणारी माहिती पुरवत होता. विश्वास संपादन करताच ‘सेंच्युरी ॲप’ नावाचे बनावट गुंतवणूक ॲप डाउनलोड करण्यास सांगून विविध बँक खात्यांमध्ये लाखो रुपये जमा करण्यास भाग पाडले जात होते. ॲपमध्ये गुंतवणूक आणि नफा वाढत असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात संपूर्ण व्यवस्था फसवणुकीची असल्याचे उघड झाले आहे.

किती कोटींची रोख मास्टरमाईंडकडे सापडली ….?

उत्तर प्रदेश सायबर विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल अडिच कोटी रुपयांचे दोन स्वाक्षरी नसलेले धनादेश, लॅपटॉप, आयफोन, दोन सिमकार्ड, तीन कंपन्यांचे शिक्के, सहा कोरी धनादेश पुस्तके, १३९ पानांची महत्त्वाची कागदपत्रे आणि एक टाटा नेक्सॉन कार जप्त केली आहे. विशेष म्हणजे आरोपीकडे पथकाला नेमकी किती रोकड सापडली याचे स्पष्टिकरण मात्र उत्तरप्रदेशच्या सायबर सेलने अद्याप दिलेले नाही. त्यामुळे रोख रकमेवरून अद्याप स्पष्टता नाही.

कधी पासून सुरू होता हा गोरखधंदा…?

चौकशीत त्याने बनावट गेमिंग आणि फॅन्टसी गेमिंगच्या माध्यमातूनही कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. तपासात आरोपीविरुद्ध विविध राज्यांत ११ गुन्हे दाखल असून, या टोळीचा संबंध राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवरील तब्बल ३,०८७ तक्रारींशी जोडला गेला आहे. तपास यंत्रणांनी आतापर्यंत सुमारे दोन कोटी रुपयांशी संबंधित बँक खाती गोठवली असून, आंतरराज्यीय टोळीतील इतरांना शोध घेतला जात आहे. त्याची ही टोळी २०२२ पासून हा गोरखधंदा करत होती.