नागपूर : खऱ्या कागदपत्रांवर शहरातल्या वेगवेगळ्या बँकेंमध्ये खाते उघडून सायबर ठगांना फसवणूकीसाठी ते खाते भाडेतत्वावर (म्यूल) उपलब्ध करून देणाऱ्या आणखी एका टोळीचा सायबर शाखेने गुरुवारी उलगडा केला. या टोळीचा मास्टरमाईंड सलीम शेख हा हुडकेश्वर पोलीस हद्दीतील रहिवासी असून कारवाईची कुणकूण लागताच टोळीतील पाच जणांसह तो पसार झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गुन्हे शाखेच्या सायबर पथकाने मंगळवारी हुडकेश्वर पोलीस हद्दीतील नरसाळा येथे सलिम शेखच्या घरावर छापा टाकला. यात पथकाला २०० बँक खात्यांचे एटीएम कार्ड, शहरातील वेगवेगळ्या लोकांच्या नावाने उघडलेल्या बँक खात्यांमधील २० हून अधिक क्यूआर कोडचे क्रमांक आणि जवळजवळ १० क्यू आर कोड स्कॅनर मशीन सापडल्या आहेत.
नागरिकांच्या खऱ्या कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते उघडून ती खाती सायबर ठगांना भाडे (म्यूल) तत्वावर पुरवणाऱ्या टोळीचा मास्टर माईंड सलिम शेख हा हुडकेश्वरमधील नरसाळा येथे ज्या खोलीवर रहात होता, त्या खोलीवर एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान सायबर शाखेच्या कारवाईची कुणकूण लागताच सावध झालेला सलिम अन्य पाच साथीदारांसह पसार झाला आहे.
म्यूल बँक खाती तपास यंत्रणांच्या रडारवर
सलिम शेख याच्या घरी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणीकडे २०० एटीएम कार्ड आणि एक लॅपटॉप सापडला आहे. त्यामुळे या टोळीने २०० जणांच्या नावाने उघडलेली बँक खाती तुर्तास गोठवली जात आहेत. सलिम शेखच्या टोळीने गेल्या काही दिवसांत अशाच पद्धतीने आणखी किती बँक खाती उघडली होती, ती कोणा कोणाला सायबर फसवणूकीसाठी भाडेतत्वावर उपलब्ध करून दिली, याची माहिती घेण्यासाठी लॅपटॉपची न्याय वैद्यक टीम मार्फत चौकशी केली जात आहे. या टोळीने उघडलेल्या बँक खात्यांमधून किती कोटींची व्यवहार झाले, कोण कोणत्या सायबर फसवणूक गुन्ह्यांत त्यातून आर्थिक व्यवहार झाले या बाबी तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत.
यापूर्वीही या ठाण्यात उघडले म्यूल खाते…
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ‘म्युल खात्यामधून मोठ्या प्रमाणात सायबर चोरट्यांकडून पैशाचा व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातही यापूर्वीही राणा प्रतानगर, तहसील, शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांच्या खऱ्या कागदपत्रांचा गैर वापर करत शेकडो बँक खाते उघडून त्यातून कोट्यवधीचे व्यवहार केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. आता हुडकेश्वर पोलीस हद्दीतही अशीच घटना समोर आल्याने म्यूल बँक खात्यांचा सायबर ठगबाजीसाठी होणारा वापर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
