नागपूर : आधार कार्ड बँकांशी संलग्न झाल्यापासून बहुतांश आर्थिक व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. अगदी किरकोळ रकमेपासून ते मोठ्या रकमेचे व्यवहार युपीआय मार्फत करण्याची सवय आता अंगवळणी पडली आहे. भ्रमणदूरध्वनी जीवनावश्यक बाबींचा भाग बनत असताना आर्थिक फसवणूकीची जोखीमही वाढली आहे. अनावधानाने फक्त एका लिंकवर केलेल्या क्लिकच्या चुकीमुळे नागपूरकरांना तीन वर्षांत ७० कोटींहून अधिक रकमेच्या ऑनलाईन फसवणूकीला सामोरे जावे लागले.
आर्थिक फसवणूक झालेल्यांमध्ये ५० टक्के नागरिक हे वयाची साठी ओलांडलेले अथवा सेवा निवृत्त सरकारी नोकरदार आहेत. कधी तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे, विमा पॉलिसी बंद होत आहे, तुमचे पार्सल अडकले आहे, अशी भिती दाखवून सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांचे खाते रिकामे केले आहे.
ऑनलाईन फसवणूकीचा सामना करावा लागलेल्या नागपूरकरांना या फसवणूकीतून आतापर्यंत अवघ्या तीन वर्षांत ७० कोटींहून अधिक रकमेचे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे आयुष्यभर काबाडकष्ट करीत पोटाला चिमटा काढून निवृत्तीच्या काळासाठी कमावलेली जमापुंजी गमावण्याची वेळ ज्येष्ठांवर आली.
ऑनलाईन फसवणूकाला आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालयाने २०२२२मध्ये सायबर सेल ही स्वतंत्र तपास यंत्रणा कार्यान्वित केली. ती सुरू झाल्या पासून आतापर्यंत १८ हजारांहून अधिक नागपूरकरांना ऑनलाईन फसवणूकीची झळ बसली. गेल्या ३ वर्षांतल्या ऑनलाईन फसवणूकीवर नजर टाकली तर ३२२ तक्रारींचा खच सायबर सेलकडे साचला.
यातील सर्वाधिक २८९ तक्रारी या आर्थिक फसवणूकीशी निगडीत आहेत. समाजमाध्यमाशी निगडीत फसवणूकीच्या ३३ तक्रारी नागपूरकरांनी केल्या. यातील फसवणूकीची रक्कम ७० कोटींहून अधिक आहे. इंटरनेटवरील ऑनलाईन निरक्षरतेचा फायदा घेत फसवणूक करणाऱ्या ४४ सायबर गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून जेमतेम २३ कोटी रुपये वसूल केले.
दोन वर्षांत २५० सायबर गुन्हे
ऑनलाईन फसवणूक झालेल्या १८ हजार नागरिकांनी २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांत पोर्टलच्या माध्यमातून अधिकृत संकेतस्थळावरून तक्रार नोंदविली. यात सायबर पोलिसांनी २५० जणांवर गुन्हे दाखल केले. यातही ४५ टक्के तक्रारी हा ज्येष्ठांनी केलेल्या आहेत. ऑनलाईन व्यवहाराविषयी त्यांच्यात असलेले अज्ञान आणि भिती याला कारण ठरली आहे. – बळीराम सुतार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल