नागपूर : कर्जाच्या रकमेची गरज असेलेल्यांना जाळ्यात ओढत सायबर ठगांच्या टोळीने अडिच लाख जणांकडून २३४ कोटींची खंडणी वसुल केल्याचा धक्कादायक प्रकार सायबर शाखेने बुधवारी चव्हाट्यावर आणला.

चार जणांची टोळी उच्चशिक्षित….

या टोळीने मस्त मनी नावाच्या भ्रमणध्वनी अॅप्लिकेशनमधून एपीके फाईल डाऊनलोड करत ही खंडणी वसुल केल्याचेही चव्हाट्यावर आले आहे.  या टोळीतील सूत्रधाराला सायबर शाखेने बुधवारी मध्य प्रदेशातील भोपाळ जवळच्या बरेसिया येथून अटक केली आहे.  कामिल सिद्दीकी वल्द हामिद सिद्दिकी (३१) असे या टोळीतील सूत्रधाराचे नाव आहे.  त्यानेच हे अॅप्लिकेशन तयार करत ते गुगल प्ले स्टोअवर उपलब्ध करून दिले होते.  यात आणखी तीन जण सहभागी असून सर्व जण उच्चशिक्षित  असल्याची माहिती सायबर शाखेचे पोलीस उपायुक्त दिपक अग्रवाल यांनी पत्रकारांना दिली.

संगणक पदविधरच निघाला सूत्रधार…

पोलिसांनी भोपाळ येथून अटक केलेला कामिल सिद्दिकी हाच या टोळीचा सूत्रधार आहे.   संगणक विषयात पदव्युत्तर असलेल्या कामिल यानेच भ्रमणध्वनीवरचे हे अॅप्लिकेशन तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध मस्त मनी अॅपला आतापर्यंत ५ लाख ३२ हजार जणांनी डाऊनलोड केले. त्यापैकी २ लाख ३४ हजार जणांकडून या टोळीने वेगवेगळ्या माध्यमातून २३४ कोटी रुपयांची सायबर खंडणी वसुल केली आहे.

कसे काम करते अॅप्लिकेशन…..

अल्प मुदतीसाठी अनेकजण भ्रमणध्वनीवर गुगल प्ले स्टोअरवर पर्याय शोधत असतात. त्यांच्यासाठी कामिल या सॉफ्टवेअर डेव्हलपरने मस्त मनी अॅप तयार केले. हे अॅप्लिकेशन भ्डाऊनलोड करताच आपोआप एपीके फाईलही भ्रमणध्वनीत डाऊनलोड होते. त्यानंतर भ्रमणध्वनी धारकाचा सगळा अॅक्सेस सायबर ठगांना मिळतो.

पाच पट वसुली आणि नंतर ब्लॅकमेलिंग….

हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करताच वापर कर्त्याचा अॅक्सेस मोबाईल ठगाकडे जातो. भ्रमणध्वनीवरील बँकेच्या  अॅप्लिकशनसह फोनमधील फोटोचा देखील अॅक्सेस ठगबाजांना मिळतो. त्या आधारे १० हजार कर्जाच्या बदल्यात पाच ते दहा पट वसुली सुरू होते. नंतर फोटोचे मॉर्फिंग करून ब्लॅकमेलिंग करत होते. ठगबाजांनी आतापर्यंत २ लाख ३४ हजार वापरकर्त्यांकडून २३४ कोटी खंडणी वसुल केल्याचे पोलिसांनी केलेल्या  तपासातून समोर आले.

असा झाला सायबर खंडणीखोर टोळीचा उलगडा….

नागपूर गुन्हे शाखेच्या सायबर शाखेकडे श्वेता बावणे या २१ वर्षीय तरुणीने फसवणूकीची तक्रार केली. त्याचा शोध घेताना सायबर शाखेला मस्त मनी अॅपवर संशय आला. पोलिसांनी कामिल सिद्दिकी नावाच्या डेव्हलपरचा माग काढत त्याला जेरबंद केले. त्याने दिलेल्या माहितीनुसार चार टप्प्यात ही टोळी काम करते. यासाठी टोळीतील एक जण अल्पमुदतीसीठी कर्ज देतो, दुसरा त्याची वसुली करतो, तिसरा एपीके फाईलमधील फोटो माॉर्फ करून खंडणीसाठी धमक्या देणारे फोन करतो. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीतील आणखी तिघे देखील उच्चशिक्षित आहेत. कामिल पकडला गेल्याचे कळताच ते पसार झाले असून सायबर शाखा त्यांचा माग काढत आहे. 

अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना घ्या काळजी…

ऑनलाईन खंडणीखोरांच्या या टोळीचा उलगडा होताच सायबर शाखेने हे अॅप्लिकेशन माध्यमावरून वगळले आहे. मात्र भ्रमणध्वनी धारकांनी कोणतेही अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे. एखादे अॅप्लिकेशन तुमच्या भ्रमणध्वनीचा अॅक्सेस मागत असले तर ते टाकण्यापूर्वी काळजी घेतली नाही तर फसवणूक होण्याची जोखीम वाढत आहे.