नागपूर : सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. सायबर शाखेत रोज दाखल होणाऱ्या डझनभर तक्रारींवरून ही गंभीरता लक्षात येऊ शकते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी गुन्हे शाखेने उत्तर आणि दक्षिण अशा दोन ठाण्यांत सायबर यंत्रणेचे विभाजन केले. मात्र, या विभाजनानंतर परिस्थिती सुधारण्या एवजी अल्पावधीतच या ठाण्यांमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष उफाळून आला आहे.
अलीकडेच ५०० रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणावरून दोन्ही ठाण्यांमधील अधिकाऱ्यांत निर्माण झालेला तणाव शहरातल्या पोलीस दलात चर्चेचा विषय ठरला होता. दक्षिण विभागात दाखल तक्रारीनंतर सायबर पथक चौकशीसाठी पुण्याला गेले. तिथे १२ जणांच्या तपासादरम्यान २५० कोटींचा हवाला व्यवहार झाल्याचे समोर आले. ‘वेलकम टू खेलेगा इंडिया’ या अधिकृत संकेतस्थळावरून येस आणि कोटक बँकेच्या ४२ बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले.
तरीही एकांश नावाच्या व्यावसायिकाला सायबर अधिकाऱ्यांनी केवळ सुचना पत्रावर सोडून दिले. त्यानंतर एकांश फरार झाला. तो अद्याप हाती लागलेला नाही. या व्यवहाराची माहिती दुसऱ्या गटातील अधिकाऱ्यांनी व्हायरल केल्याने वाद तीव्र झाला.
सहकाऱ्यांमध्येच हाणामारी
या प्रकरणातून दोन्ही गटांमध्ये उघड संघर्ष सुरू झाला आहे. याची ठिणगी गेल्या आठवड्यात पडली. यावरून संतप्त अधिकाऱ्याने आपलाच सहकारी ठाकरे नावाच्या हवालदाराचा मोबाईल हिसकावून त्याला मारहाण केल्याची घटना घडली.
संबंधित हवालदाराने सहपोलीस आयुक्तांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानंतर हवालदार ठाकरे दोन दिवस बेपत्ता राहिला. त्याची तक्रार कुटुंबीयांनी सदर पोलीस ठाण्यात केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी सावध झाले आहेत. पूर्वी एकत्र काम करणारे कर्मचारी आता परस्परांचे शत्रू झाल्यासारख्या भूमिकेत दिसत आहेत.
वरिष्ठ अधिकारीही त्रस्त
सायबर विभागावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पूर्वी उपायुक्त लोहित मतानी यांच्याकडे होती. मात्र त्यांच्यावर वाहतूक शाखेचीही जबाबदारी आहे. त्यामुळे उत्तर विभाग सायबर ठाण्याच्या विभाजनानंतर ही जबाबदारी उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र दोन्ही ठाण्यांमधील अंतर्गत सुंदोपसुंदीमुळे हे अधिकारीही त्रस्त आहेत.
संतापजनक प्रकार
सायबर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार संतापजनक आहे. याबाबत ठाकरे नावाच्या हवालदाराने तक्रार केली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाला. तो सुखरुप परतला असला तरी संबंधितांना समज देण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांमार्फत याची चौकशी केली जात आहे. लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.
