नागपूर : डाबो पबमध्ये तरुणीशी अश्लील चाळे केल्यावरून झालेल्या वादात विमानतळाकडे जाणाऱ्या भर चौकात शुक्रवारी पहाटे एकाचा खून झाला. यातील दुसऱ्या जखमीचाही मंगळवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणात आता दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव ब्रिजलाल कारडा (३२) रा. चिखली, कळमना असे मृत झालेल्या दुसऱ्या तरुणाचे नाव आहे.

गौरव याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मारेकऱ्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गौरवने सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी पहाटे झालेल्या या खून प्रकरणात पोलिसांनी सहाही मारेकऱ्यांना शनिवारी जबलपूर महामार्गावरून अटक केली होती.

हे सहाही जण खून केल्यानंतर मध्य प्रदेशातील अज्ञातस्थळी पळून जात असताना मागावर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी करत त्यांना अटक केली. मेहूल रहाटे, सौम्या देशमुख, ऋषी शर्मा, तुषार नानकानी, अभय जमतानी, राजीव चावला अशी पोलिसांनी पाठलाग करून अटक केलेल्या या सहा मारेकऱ्यांची नावे आहेत. या सर्वांनी मिळून प्रणय रमेश रन्नावरे (२८) रा. महल आणि त्याचा मित्र या दोघांवर जीवघेणा हल्ला केला होता. यात पोटात लोखंडी सळई खोलवर खुपसली गेल्याने प्रणयचा आधी मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी दुसऱा जखमी गौरव कारडा याचाहा मृत्यू झाला.

नाताळ सणाच्या रात्री पार्टीत झालेल्या वादानंतर शुक्रवारी पहाटे सहा जणांनी मिळून हॉटेल प्राईड समोरच्या भर चौकात या दोघांवर जीवघेणा हल्ला केला होता. भर चौकात एका गटाने दगड, सळई आणि चाकूने हल्ला करत प्रणयला रक्ताच्या थारोळ्यात लोटले. प्रणय हा रोखे बाजारात व्यवसाय करतो. तर गौरव एका सीएकडे नोकरी करत होता. नाताळसाठी मुंबईतील बोलावलेल्या मैत्रिणी सोबत नाताळचा सण हा या दोघांसाठी अखेरचा ठरला.

नाकाबंदीत सापडले होते मारेकरी

आधीच चिडलेल्या गौरव आणि प्रणयने बाहेर येत कारकडे धाव घेतली. त्यानंतर सहापैकी चार युवकांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये प्रणयचा मृत्यू झाला तर गौरवच्या पोटात घाव लागल्यामुळे तो जखमी झाला. त्यानंतर मारेकरी कारने जबलपूरकडे पळाले. गुन्हे शाखेला माहिती मिळताच पथकाने नाकाबंदी करत जबलपूर जवळ शनिवारी सकाळी सर्वांना अटक केली.