“भीमासा की हिंदमें आई सवारी, चित भी हमारी और पट भी हमारी” हे गाणे आहे, रतन मेहतर या कव्वालाचे! नागपुरात जेव्हा ते या शब्दात आंबेडकरांवर गाणे गायचे, तेव्हा जमलेले लोक मंत्रमुग्ध होत. रामरतन जानोरकर नागपुरातील आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे प्रस्थ सुद्धा भंगी समूहातून येतात. आपल्या समाजाचा टोकाचा विरोध सहन करून त्यांनी आंबेडकरी चळवळीला सातत्याने समोर नेले. वस्तुत: देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपुरात देशाच्या विविध भागातून, विविध विचारप्रवाहांचे लोक एकत्र येऊन राहिल्याने नागपूर शहर हे कायमच सामाजिक सलोखा असलेलं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पण असे असूनही रामरतन जानोरकर यांच्यासह भेदभाव मोडून मानवी भूमिका घेणाऱ्यांना पराकोटीची मानसिक आणि आर्थिक घुसमट सहन करावी लागली. एवढेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनाही त्या दिव्यातून जावे लागले. हाही इतिहास आहे. मानवी व्यवहारातील असहमतीची अनेक उदाहरणे असतानाही परस्परविरोधी भाषा, संस्कृती आणि विचारांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, हे नागपूर शहराच्या ‘उदारमतवादी’ स्वभावाचे वैशिष्ट्य. ही परंपरा अनेकांनी जपली.
१९३० साली अखिल भारतीय दलित काँग्रेस परिषदेचे आयोजन नागपुरात करण्यात आले होते. या परिषदेत हैबती देवाजी बेहाडे यांची भूमिका फार महत्त्वाची होती. ते मातंग समाजाचे होते, याची नोंद घेतली पाहिजे. या ऐतिहासिक परिषदेत एक ‘महिलांची विशेष सभा’ ही आयोजित केली. त्या सभेच्या अध्यक्षा होत्या, गुणाबाई गाडेकर. त्या चांभार समाजाच्या होत्या. १९३६ साली नागपूरच्या म्युन्सिपल कॉटन मार्केटमध्ये अस्पृश्य समाजाच्या उदारमतवादाचे एक उत्तुंग उदाहरण म्हणून सांगता येईल अशी एक घटना घडली. या इमारतीत महार, मांग, चांभार आणि भंगी जातींच्या स्त्री-पुरुषांचे सहभोजन समारंभपूर्वक झाले. या ‘कढीभात सहभोजन’ समारंभाचे अध्यक्ष होते, हैबती देवाजी बेहाडे. बेहाडे हे ‘मातंग विद्यार्थी बोर्डिंग, नागपूर’चे सेक्रेटरी होते हेही लक्षात घेतले पाहिजे. या समारंभाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ते म्हणाले, ‘आजपर्यंत महार जातीवर अप्पलपोटेपणा व स्वतःच्याच उन्नतीकरिता झटणारी जात व इतर लहान सहान जातींचा विटाळ मानणारी व मांग, चांभार आणि भंगी यांच्यापासून फटकून वागणारी महार जात आहे, अशा महारेतर जातीकडून शिंतोडे व दुगाण्या मिळत होत्या. पण आज या ‘कढीभात सहभोजना’ने महार जातीसंबंधी ज्या निरर्थक अफवा परसवल्या जात होत्या, त्या सर्व फोल ठरल्या आहेत.’
त्याप्रसंगी हैबती बेहाडे यांनी केलेले प्रबोधन पुढच्या अर्धशतकातील चळवळीच्या बांधणीला महत्त्वाचे ठरले. महार जातीवर वर्चस्ववादी म्हणून होणाऱ्या आरोपांचे त्यांनी सप्रमाण खंडन केले. अस्पृश्यता आणि जात-मुक्तीच्या व्यापक आंदोलनासाठी महार, चांभार, मांग व भंगी या जातींचे एकीकरण झाले पाहिजे. या सगळ्यांनी मतभेद विसरून एकत्र संघटित झाले पाहिजे, आणि अखिल भारतीय अस्पृश्य समाजाचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल टाकले पाहिजे, असे मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केले.
त्या काळातील जातीय आणि स्त्री-पुरुष भेदाभेदाचे कट्टर स्वरूप लक्षात घेतले तर त्या सामूहिक सहभोजनात अस्पृश्यांमधील बहुतेक सर्व जातींच्या स्त्री-पुरुषांनी भाग घेतला, ही गोष्ट आज फार महत्त्वाची वाटते. स्त्रियांनीही मोठ्या आनंदाने व धडाडीने ‘कढीभात सहभोजना’त भाग घेऊन परिवर्तनाच्या लढ्यात आम्हीही मागे नाही, हे लोकांच्या निदर्शनास आणून दिले, हे लक्षात घेतले पाहिजे. या सहभोजनात सुमारे पाऊणे दोनशे अस्पृश्य वर्गाच्या स्त्रीपुरुषांनी भाग घेतला. सर्वच जातीच्या लोकांनी भोजन व पाणी वाढण्याचे काम मोठ्या उत्साहाने केले. या सहभोजनात पंडित रेवाराम कवाडे, एस.व्ही. डहाट, धर्मदास नगरारे, विठ्ठलराव साळवे, सदाशिव माटे, नत्थू बोरकर, गणपती कवाडे, शामराव बहादुरे, राधाबाई कांबळे, बनूबाई ढेंगरे, सीताबाई मांडके व मोहनाबाई माणके आदी हजर होते. समजातील जातिव्यवस्थेतील उतरंडीमुळे अस्पृश्य जातीमधील अंतर्गत व्यवहारातही भेदाभेद असतानाही तत्कालीन समाजधुरिणांनी जी उदात्त माणुसपणाची भूमिका घेतली त्यामुळेच चळवळ पुढे गेली.
अशा अभिनव आंदोलनातूनच नागपुरातील दलित चळवळीने डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करताना महारेतर समाजाच्या परिवर्तनाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती हे लक्षात घेतले पाहिजे. डॉ. आंबेडकरपूर्व काळात मध्यप्रांत व वऱ्हाड भागात विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासोबत अनेक अस्पृश्य सहकाऱ्यांनी काम केले. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी नागपुरातील ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन, डिप्रेस्ड इंडिया असोसिएशन, तरुण महार संघ, चोखामेळा कन्या पाठशाळा, वऱ्हाड एज्युकेशन सोसायटी, महार सेवा दल, चोखामेळा समाज, विश्व सेवादल, दलित युद्ध मंडळ, एज्युकेशन इम्प्रूव्हमेंट सोसायटी इत्यादी संस्थांनी एकत्र येऊन विठ्ठल रामजी शिंदे यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. याच काळात नागपूर शहरातील ‘दलित-हरिजन महिला समाजा’तर्फे महात्मा गांधींनाही मानपत्र दिले होते. मध्यप्रांत व वऱ्हाड भागातील हरिजन मुलींकरिता नागपूरला एक हरिजन महिला आश्रम उघडण्यात यावा व यासाठी त्यांनी विचार करावा, असे त्यांना दिलेल्या मानपत्रात म्हटले आहे.
१९४२ साली डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कामठी येथे झालेल्या एका सभेचे अध्यक्ष कामठीचेच डॉ. अहमदी, व्हाइस प्रेसिडेंट, म्युन्सिपल कमिटी हे होते. आदिवासींमध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी गड्डीगोदाम भागात झुलाबाई या गोंड आदिवासी महिलेने शाळा सुरू केली. अस्पृश्यांची वस्ती जवळ असलेल्या या शाळेत दलित मुलींनाही प्रवेश होता. या शाळेत लक्ष्मी ही अस्पृश्य मुलगी शिकत होती. नागपूर शहरात बापट नावाच्या ब्राह्मण गृहस्थाचे चिटणीस पार्कसमोर एक हॉटेल होते. ते हॉटेल त्या काळात अस्पृश्यंकरिता खुले होते. अशाप्रकारचे नागपूरमधील बापटांचे हे एकमेव हॉटेल होते. तेथे इतर स्पृश्य सुद्धा येत असत. पण सर्वच लोक हे अस्पृश्यांशी समतेने व्यवहार करत होते, असेही नाही. जातीय भेदभावाच्या अनेक क्रूर घटना तेव्हाही घडलेल्या होत्याच. परंतु ज्यांनी भेदाभेद मोडण्याची भूमिका घेतली त्यांची दखल घेतली गेली पाहिजे. ज्याप्रमाणे विषमतेला अनेक बाजू असतात त्याप्रमाणे समतेच्या भूमिकेलाही अनेक बाजू असतात. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत परिवर्तन, प्रबोधन या शब्दांना महत्त्व ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियाले नाही बहुमता’ या उक्तीप्रमाणे भूमिका घेणाऱ्या लोकांमुळे प्राप्त होते.
