नागपूर: सर्वाेच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला दलित संघटनांची एकता दिसून आली. सकाळी दहा वाजतापासून शहराच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने नागरिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी देत उत्स्फूर्तपणे संविधान चौकात जमा झाले. येथे झालेल्या सभेतून सर्वाेच्च न्यायालय आणि केंद्र सरकारवर सडकून टीका करण्यात आली.
अनुसूचित जातीसाठी असलेले आरक्षण देताना त्यात वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निकाल देताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सातसदस्यीय घटनापीठाने अनुसूचित जाती हा एकसंघ गट नसून त्यातील विविध जातींमध्ये विषमता असल्याचे निरीक्षण नोंदविले. सोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील आरक्षणाचा लाभ योग्य घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वर्गातही ‘क्रीमिलेयर’ लावण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने दिले. याविरोधात दलित आणि आदिवासी संघटनांनी बुधवारी ‘भारत बंद’ची हाक दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे आरक्षण बचाव संघर्ष समितीचे म्हणणे आहे. या भारत बंदला बहूजन समाज पार्टी, वंचित बहूजन आघाडी, भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह विविध दलित आणि आदिवासी संघटनांसह बहुतांश विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. बुधवारी संविधान चौकात झालेल्या सभेला ज्येष्ठ पत्रकार रणजीत मेश्राम, स्मिता कांबळे, प्राचार्य मसराम, प्रा. पिसे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा – सावधान! मंकीपॉक्स झपाट्याने पसरतोय… नागपुरातील ‘या’ रुग्णालयांत उपचाराची व्यवस्था
डॉ. नितीन राऊत सहभागी
आंबेडकरी संघटनांनी भारत बंदनिमित्त कमाल चौकातून रॅली काढली. त्याला काँग्रेस आमदार डॉ. नितीन राऊत यांनी पाठिंबा दिला असून काँग्रेस कार्यकर्तेसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होते. सुरुवातीला कमाल चौक, इंदोरा या परिसरात दुकाने उघडी होती. पण, या परिसरातून रॅली जाताना दुकानदारांना दुकाने बंद करायला लावली. उत्तर नागपूर या भागात आंबेडकरी चळवळींचे जास्त वर्चस्व आहे. त्यामुळे याठिकाणी बंदचा प्रभाव पाहायला मिळाला.
हेही वाचा – “निकटवर्तीयांमुळेच माझा पराभव”, ‘या’ भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
शाळा, महाविद्यालये, बाजारपेठांवर परिणाम नाही
‘भारत बंद’ची हाक देण्यात आली असली तरी त्याचा फारचा परिणाम शाळा, महाविद्यालये, बाजारपेठांवर दिसून आला नाही. भारत बंद निमित्त हजारोंच्या संख्येने नागरिक संविधान चौक येथे जमा झाले. शहराच्या विविध भागातून रॅलीही काढण्यात आल्या. परंतु, त्याचा बंदवर फारसा प्रभाव पाहायला मिळाला नाही. उत्तर नागपूरमध्ये मात्र बंदचा प्रभाव दिसून आला.