शिक्षण हा तसा दलित समूहासाठी नाकारलेला विषय होता. काळानुरूप सामाजिक व आर्थिक राजकीय परिस्थिती बदलली. आधी बंदिस्त असलेले शिक्षण सर्वांसाठी खुले झाले. विशेषतः ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले. त्यामुळे ज्यांना शिकण्याची बंदी होती अशा वांचित समूहांना शिक्षण मिळायला लागले. नागपूर शहर आदिवासी राजे, भोसले राजे नंतर ब्रिटिश अशा वेगवेगळ्या शासकांच्या प्रशासनाखाली राहिलेला प्रदेश होय. यामध्ये सामाजिक परिवर्तनाची चळवळ डॉ. आंबेडकरपूर्व ब्रिटिश काळामध्ये सुरू झाली.
दलित समूहामधून येणाऱ्या पहिल्या पिढीच्या समाजसुधारकांनी आपल्या सामाजिक भूमिका घेतल्या. नंतरच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात नागपूर शहर आपली वेगळी ओळख घेऊन समोर आले. नागपूर शहरामध्ये आंबेडकरी चळवळीच्या पाऊलखुणा पावलोपावली दिसतात. डॉ. आंबेडकरपूर्व काळात स्थापन झालेले वेगवेगळे ज्ञाती संघ त्याचबरोबर त्यांनी स्वत:च्या न्याय हक्कासाठी दिलेले लढे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात इथे झालेल्या अस्पृश्यांच्या सभा अशा अनेक महत्त्वाच्या खुणा नागपूर शहरामध्ये फिरताना आपल्याला दिसून येतात.
या शहराची आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे या शहरामध्ये सुरू असलेल्या शैक्षणिक चळवळी. आंबेडकरी चळवळ शिक्षण या विषयाला प्राधान्य देणारी जगातील एक महत्त्वाची चळवळ होय. दलित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक चळवळी या महाराष्ट्रभर अत्यंत मजबुतीने उभ्या होत्या. शिक्षणासाठी लढा देत होत्या. शिक्षणामध्ये जो समूह सामाजिक रेट्यांमुळे उशिरा आला, तो म्हणजे दलितांमधील महिलांचा व मुलींचा समूह. १९३०-३२ च्या सुमारास नागपूरच्या एका कन्या हायस्कूलमध्ये महार मुलीने प्रवेश मिळवण्याकरिता प्रयत्न केला असता शाळेच्या संचालकांनी नाकारले, परंतु म्युनिसिपल कौन्सिलर तुलाराम साखरे यांनी जेव्हा, ‘मुलीला प्रवेश दिला नाही तर ग्रँट बंद करू’ अशी ताकीद दिली तेव्हा त्या मुलीस प्रवेश मिळाला.
अस्पृश्य मुलांना शाळेत प्रवेश मिळू न देणे, मिळाल्यास त्यांना इतर मुलांसोबत बसू न देणे, बसू दिले तरी इतर मुलांनी त्यांच्याशी समतेने न वागणे, इतरांबरोबर त्यांना पाणी पिण्याची, डबा खाण्याची अथवा खेळ खेळण्याची मनाई असणे अशा परिस्थितीत दलित विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात कशाप्रकारे स्वतःला उभं करत असतील याची कल्पना न केलेली बरी. नागपूर शहरामधील विशेषतः दलित समूहातून येणाऱ्या मुलींनी सुद्धा स्वत:ची एक वेगळी ओळख तत्कालीन कालखंडामध्ये निर्माण केलेली दिसून येते. इथे असलेल्या शैक्षणिक संस्था हिस्लॉप कॉलेज, मॉरिस कॉलेज, सेवासदन, नागपूर विद्यापीठ, ख्रिश्चन मिशनरींच्या नागपूर शहरातील विविध शाळा, अस्पृश्य मुलींसाठीचे वसतिगृह आणि इतर शैक्षणिक संस्थांमधून ज्या दलित मुली शिकत होत्या त्यांनी ‘शिक्षण’ सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी चळवळ सुरू केली. ही चळवळ दोन प्रकारे काम करत होती.
पहिला प्रकार हा शिक्षण घेणाऱ्या दलित मुलींच्या पहिल्या पिढीला संघटित करत होती. दुसरा प्रकार हा त्यांच्या मागून येणाऱ्या मुलींच्या पिढीसाठी एक सुरक्षित वातावरण तयार करत होती. नागपूर शहरामध्ये अशाप्रकारची अस्पृश्य मुलींची संघटना असणं ही एक मोठी व महत्त्वाची बाब आहे. १९३५ रोजी कामठी मेथडिस्ट स्कूल येथे मध्यप्रांतीय अस्पृश्य विद्यार्थी संमेलनाचे चौथे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये मॉरिस कॉलेज, हिस्लॉप कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये दलित विद्यार्थिनी विमलाबाई रंगारी,शांताबाई पाटील, भागूबाई मेश्राम, शेवंतीबाई घोडेस्वार, राधाबाई गणवीर, यशोदा गवळी, सावित्रीबाई वासनिक, रामसरलाबाई बोरकर या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. याचाच अर्थ हा आहे की, या ज्या शैक्षणिक संस्था आहेत या संस्थांमधील तत्कालीन वातावरण हे दलित वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी चळवळीत भाग घेण्याइतपत सहिष्णू होते. डिप्रेस्ड क्लासेस गर्ल्स हॉस्टेल नागपूरमध्ये होते तिथे बऱ्याच मुली शिक्षणासाठी राहत होत्या.
तसेच या विविध संस्थांमधून शिकलेल्या मुलींनी नंतर शिक्षिका बनून स्वतः शाळा चालवल्या शांताबाई ढोक नंतरच्या शांताबाई खापर्डे या सेवासदनमध्ये शिकलेल्या त्या स्वतः शिक्षिका होत्या, यांनी लग्नानंतर त्यांच्या पतीसोबत दामोदर हायस्कूल काही दिवस चालवली. त्याच्या द न्यू एजुकेशन सोसायटीच्या वसतिगृह आणि शाळा मिळून ८-९ शाखा होत्या. मि. बागडे व मिसेस बागडे यांनी समता हायस्कूल काढली होती. असे काही उदाहरण नागपूर शहरातील देता येतात.
सुरुवातीला दलित मुलामुलींचे एकत्रित अधिवेशने होत होती. त्यांनतर दलित मुलींनी त्यांचे मुलींचे वेगळे अधिवेशन घेतल्याचे दिसून येते. मध्यप्रांत वऱ्हाड अस्पृश्य विद्यार्थिनींचे पहिले संमेलन जून १९३६ मध्ये आयोजित करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्ष ए.व्ही. डहाट बी.ए. यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर कॉटन मार्केट येथे भरवण्यात आले. स्वागताध्यक्ष यशोदाबाई डहाट यांनी आपल्या स्वागतपर भाषणात स्त्री शिक्षणाच्या माहितीबद्दल सविस्तर विवेचन केले. विद्यार्थिनींच्या संघटनेवर व शिक्षणाविषयी विचार प्रकट करणारी भाषणे चंद्रभागाबाई (वर्धा), शारदाबाई ढवळे, सरलाबाई बोरकर (इंदोर), चंद्रावतीबाई मंडले व सखूबाई मेश्राम यांनी केले. यानंतर ठराव पास झाले व शेवटी व्यवस्थापक या नात्याने अंजनीबाई देशभ्रतार यांनी आभार मानले.
या संमेलनाचे कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे होते. त्यात नागपूरमधील पुढील विद्यार्थिनी होत्या. स्वागताध्यक्ष यशोदाबाई डहाट मोकोसा बाग नॉर्मल स्कूल, खजिनदार भागीरथीबाई रामटेके (सेवासदन), जनरल सेक्रेटरी शारदाबाई ढवळे (सेवासदन), सहाय्यक सेक्रेटरी जनाबाई तागडे (सेवासदन), जिजाबाई पाटील,(सें.उ.हा.स्कू.), गेम्स सेक्रेटरी राजकुमारी बेले (तलाव मिशन स्कूल), प्रदर्शन सेक्रेटरी अन्नपूर्णाबाई मून (भिडे गर्ल्स हायस्कूल) तर या संघटनेच्या सभासद द्रौपदीबाई खोब्रागडे, यशोदाबाई कांबळे (चांदा), जानकीबाई सोमकुंवर छिंदवाडा, कमलाबाई मेश्राम, पवनी भंडारा, बनूबाई ढेंगरे नागपूर सेवासदन, पार्वतीबाई सोनटक्के नागपूर (सेवासदन), अंजिरा मोडक (सें.उ.हा.स्कू.), सावित्रीबाई दामले नागपूर मेको नॉ.स्कू., लतिकाबाई गजभिये मेको स्कूल, सुलोचनाबाई कोसारे नागपूर, सत्यभामा पाटील, यमू ताकडे नागपूर, विमल सोमकुंवर नागपूर, सावित्रीबाई वायले नागपूर (सेवासदन), मंजूळाबाई बोरकर नागपूर सेवासदन इत्यादी.
दलित चळवळीच्या इतिहासातील अनेक घडामोडी महत्त्वाच्या आहेत. डॉ. आंबेडकरपूर्व व डॉ. आंबेडकरकालीन नागपूर शहरातील दलितांच्या चळवळीने या समूहाचा सामाजिक क्षेत्रातील प्रत्येक भाग व्यापला होता. यामध्ये दलित स्त्रियांच्या शैक्षणिक क्षेत्रालाही महत्त्वाचे स्थान होते असे दिसून येते. नागपूर शहरातील दलित मुलींची शैक्षणिक संघटना आजच्या आंबेडकरी बौद्ध महिलांच्या सुशिक्षित पिढीच्या निर्माणाच्या पाठीमागचे एक महत्त्वाचे कारण आहे. Sawarkarsunita1987@gmail.com
