नागपूर : धंतोली पोलीस हद्दीतील बलराज मार्गावर दुर्गा सदन येथील रहिवासी एकाच कुटुंबातील पाच जण अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात २४ जूनला घर सोडून निघून गेलेल्या कुटुंबातील कोणाचाही संपर्क होत नसल्याने भावाने अखेर शनिवारी धंतोली पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

हर्षा सुरेश परसवानी (५७), जितेंद्र सुरेश परसवानी (४२), ईशिता जितेंद्र परसवानी (४०), खुषी जितेंद्र परसवानी (२१), कृष्णा जितेंद्र परसवानी (१२) अशी घर सोडून अचानक बेपत्ता झालेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.

नेमके कारण काय?

ते नेमके कशामुळे घर सोडून गेले, कर्जबाजारीपणामुळे पैसे वसुलीसाठी त्यांना कोणी त्रास देत होता का, की यामागे काही घातपात आहे, याचा कसलाही उलगडा अद्याप झालेला नाही. परवानी कुटुंबातील तक्रारदार भावाला देखील कर्जाबद्दल कसलीही माहिती नसल्याने पाच जणांच्या बेपत्ता होण्या मागे नेमके कारण काय याचे कोडे पोलिसांना पडले आहे.

शेवटचे लोकेशन…

गेल्या दहा दिवसांपासून भाऊ आणि त्याच्या कुटुंबातील कोणाचाही संपर्क होत नव्हता. त्यामुळे भाऊ श्यामसुंदर परसवानी (७१) यांनी धंतोली पोलीस ठाणे गाठत शनिवारी रात्री तक्रार दाखल केली. पोलिसांनी भ्रमणध्वनींवर संपर्क साधला असता सर्वांचे फोन बंद होते. त्याचे शेवटचे लोकेशन तपासले असता ते पुणे येथे आढळले. परसवानी कुटुंबातील काही नातेवाईक पुणे येथे राहतात. पोलिसांनी त्यांच्याशी देखील संपर्क साधला. मात्र त्यांनी ते आपल्याकडे आले नसल्याचे सांगितल्याने गुढ निर्माण झाले आहे.

मानसिक धक्क्याचीही शक्यता

धंतोली येथील रहिवासी या कुटुंबातील कर्ता पुरुष सुरेश परसवानी यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. सुरेश यांच्या पत्नी हर्षा, मुलगा जितेंद्र, सून इशिता आणि त्यांचा मुलगा देखील कोणाशी मनमोकळेपणाने बोलत नव्हते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे कुटुंब खचल्याने नैराश्य आणि चिंतेत होते. दरम्यान सुरेश यांच्या मोठ्या भावाने कुटुंबातील पाच जण अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील नागरिकांची विचारपूस केली. त्यावेळी ही माहिती समोर आले. त्यामुळे पोलीस सर्व शक्यता पडताळून पहात आहेत.