नागपूर : शहरातील अत्यंत वर्दळीच्या धरमपेठ परिसरात शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण ‘हिट अँड रन’च्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरधाव वेगात आणि कथित मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या चालकाने योग वर्गासाठी निघालेल्या ज्येष्ठ महिलेला चिरडून घटनास्थळावरून पळ काढला.

ही घटना सकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्कसमोरील सुगंध मंगल कार्यालयाला लागून खरेटाऊनकडे जाणाऱ्या गल्लीत घडली. या वेळी परिसरात अनेक नागरिक मॉर्निंग वॉक आणि योगासाठी बाहेर पडलेले होते.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगला रामदासपंत केवटे (७२), या धरमपेठ येथील हसुदानी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होत्या. नेहमीप्रमाणे त्या सकाळी योग वर्गासाठी जात असताना, बारलिंगी चौकाजवळील सांजवाट अपार्टमेंटकडून पायी येत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याने संताप व्यक्त केला जात आहे. प्राथमिक तपासात कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या मते कारचालक खूप वेगात वाहन चालवत होता. महिलेला धडक दिल्यानंतर तो थांबला देखील नाही. माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरात लावेल्या सीसीटीव्हीतून कारचालकाचा शोध सुरू केला आहे.

योग – प्रवचनाचा नित्यनेम चुकला

वयाच्या ७२ व्या वर्षी देखील मंगला केवटे या समाज आणि धार्मिक कार्यात सक्रिय होत्या. न चुकता त्या नित्यनेमाने सकाळी पावणेसहाच्या सुमारास योग वर्गाला जाऊन आल्यानंतर सकाळी गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी जायच्या. प्रवचन, भजनात सक्रिय असलेल्या मंगला यांनी नागपुरात असताना कधीही दिनचर्येत खंड पडू दिला नाही. मात्र शनिवारी काळाने झडप घातल्याने त्यांचा नित्यनेम अपूर्ण राहिला. त्यामुळे मंगला यांचे निकटवर्तीय हळहळले आहेत.

शिकवणीवर्ग आणि वसतीगृहांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

धरमपेठ, रामदासपेठ आणि गोकूळपेठेत मोठ्या प्रमाणात खासगी शिकवणी वर्ग आहेत. शिवाय या परिसरात अनेक खासगी वसतिगृहे देखील आहेत. त्यामुळे या भागात नेहमीच विद्यार्थी आणि तरुणांची गर्दी असते. हे तरुण भरधाव वेगात वाहने चालवतात. त्यात सकाळी घडलेल्या प्राणांतिक अपघाताच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क परिसरात दररोज मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी सकाळी फिरण्यासाठी व योगासाठी येतात. त्यामुळे या भागात सुरक्षिततेचे विशेष उपाययोजना आवश्यक असल्याची मागणी होत आहे.