‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रसिद्ध वाक्य. या एका वाक्याने दलित म्हणून हिणवल्या जाणाऱ्या मागास समाजाला प्रेरणा मिळाली व नंतर इतिहास घडला. केवळ राज्यच नाही, देशभरातील लाखो अनुयायी या वाक्याचा आधार घेत शिकले, संघटित झाले व अन्यायाविरुद्ध संघर्ष करू लागले. हा संघर्ष प्रामुख्याने सवर्णांच्या वर्चस्ववादाविरुद्ध होता, याचीच री ओढणाऱ्या प्रशासनाविरुद्ध होता, अशीच मानसिकता बाळगणाऱ्या राज्यकर्त्यांविरुद्ध होता. त्यात किती यश आले हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. कारण आजही ही वर्चस्ववादी मानसिकता अधूनमधून डोके वर काढत असते. त्याविरुद्ध लढण्यासाठी मागास समाजाला अनेकदा रस्त्यावर यावे लागते. आता याच समाजासमोर स्वकीयांविरुद्धच लढण्याची वेळ येते की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती ते करावे लागणे हे केव्हाही वाईट पण या समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी ही वेळ या अनुयायांवर आणली आहे एवढे मात्र निश्चित.
याचे ताजे उदाहरण म्हणजे नागपूरच्या दीक्षाभूमीचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या संस्थेत सुरू असलेले वाद. हे लोण केवळ याच शहरापुरते मर्यादित नाही. चंद्रपूर, संभाजीनगर, मुंबई अशा अनेक ठिकाणच्या संस्थांमध्ये पसरलेले. इथे कुणाचेही नाव घ्यायचे नाही पण आंबेडकरांनंतर राज्यात उभ्या राहिलेल्या नेतृत्वाच्या फळीने आधी राजकीय भूमिकांचा विचका केला. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची पार शकले झाली ती यातून. राजकीय महत्त्वाकांक्षा, त्यातून जन्म घेणाऱ्या स्वार्थी वृत्तीमुळे हे रिपब्लिकन राजकारण पार लयाला गेले. इतके की आता ते अदखलपात्र ठरलेले. सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी निर्माण झालेल्या भारतीय बौद्ध महासभेतही तेच घडले. यातही इतके गट पडले की कोण खरे व कोण खोटे असा संभ्रम प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावा. आता हे लोण शिक्षणक्षेत्रात पसरले आहे.
येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात जे काही सुरू आहे ते केवळ उबग आणणारे नाही तर समाजाच्या संतापात रोज नव्याने भर घालणारे. हे महाविद्यालय अनुयायांसाठी पवित्र असलेल्या दीक्षाभूमीवर आहे याचाही विसर या भांडणखोरांना पडला आहे. समाजाचे उत्थान करताना केवळ विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करा हेच आंबेडकरांना अपेक्षित होते. तसे ते बोलूनही दाखवायचे. आता या संस्थांना घराणेशाहीने घेरलेले. संस्था म्हणजे जणू आपली खाजगी मालमत्ताच आहे अशा थाटात त्यावर दावा सांगणारा अथवा ताबा मिळवून असणारा वागू लागलेला. हे आंबेडकरांना अपेक्षित होते काय? पवित्रस्थळी असलेल्या या महाविद्यालयात एकमेकांना मारहाण काय होते? कर्मचाऱ्यांचा छळ काय होतो? त्यांचे वेतन काय अडवले जाते? ही सारी मनमानी बाबासाहेबांच्या स्वप्नांचा रोज पराभव करू लागली आहे.
डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म का त्यागला तर अन्याय सहन करायचा नाही म्हणून. ज्या पवित्र भूमीवर हे घडले त्याच भूमीवर केवळ वर्चस्ववादातून अन्याय होत असेल तर हा आंबेडकरांच्या विचारांचाच पराभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ही संस्था कायम वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जे पदावर आहेत त्यांना घालवण्याची धुरा एका गटाने अंगावर घेतली आहे, तर पदावर असणाऱ्यांना काहीही करून ताबा सोडायचा नाही. इतर कोणत्याही सार्वजनिक संस्थेत असा वाद असता तर सरकारने तातडीने हस्तक्षेप केला असता. मात्र या वादात सरकार उडी घ्यायला तयार नाही. याचे एकमेव कारण आंबेडकरांच्या विचाराने जागृत झालेल्या समाजाच्या भूमिकेत दडले आहे. काही महिन्यांपूर्वी साध्या वाहनतळाच्या मुद्यावरून समाज संतप्त झाला व सरकारला सपशेल माघार घ्यावी लागली. तसे पुन्हा वाट्याला येऊ नये म्हणून सरकार गप्प आहे. ही भूमिका योग्यच आहे. अशा स्थितीत समाजाची जबाबदारी वाढते. त्यामुळे आता या समाजातील कर्त्यांनी पुढाकार घेत या स्वार्थी नेतृत्वाला वठणीवर आणणे गरजेचे. हे महाविद्यालय तसेच संस्थेतील अनेक छळकथा अलीकडच्या काळात समोर आल्या. त्यातल्या काही तर अंगावर काटा आणणाऱ्या होत्या. त्यावरून पोलीस तक्रारी झाल्या. कोर्टकज्जे सुरू झाले पण पुढारीपण करणारे भानावर यायला तयार नाहीत.
तेव्हाच्या शिक्षण व्यवस्थेत मागासांवर अन्याय व्हायचा. त्यांना दुय्यम वागणूक दिली जायची. अस्पृश्यतेचा सामना करावा लागायचा, कस्पटासमान लेखले जायचे म्हणून आंबेडकरांनी ठिकठिकाणी शैक्षणिक संस्था सुरू केल्या. तुम्ही अन्याय करता ना, मग आम्हीच आमची शिक्षण व्यवस्था उभी करू असा बाणेदारपणा या भूमिकेमागे होता. आंबेडकर निवर्तल्यानंतर दीर्घकाळ या संस्थांचा दबदबा कायम राहिला. येथे केवळ शिक्षणच दिले जात नाही तर भेदभाव न मानणारी पिढी घडवली जाते असे आदराने सांगितले जायचे. संस्थात्मक वादामुळे आज या शिक्षण व्यवस्थेची लक्तरे रोज वेशीवर टांगली जात आहेत. त्यांचा दर्जा, प्रतिष्ठा सारे काही लयाला गेलेले. एकेकाळी व विशेषत: कृष्णकुमारांच्या काळात आंबेडकर महाविद्यालयात प्रवेश मिळवणे हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असायचे. केवळ मागासच नाही तर सवर्ण विद्यार्थ्यांचे सुद्धा! आज या महाविद्यालयाची रया पार गेली आहे. हे घडले केवळ वादामुळे. यातून आपण आंबेडकरांच्याच स्वप्नांची राखरांगोळी करतोय याचेही भान कुणाला राहिलेले नाही. संस्था व्यवस्थापन ही काही साधी बाब नाही. त्यात सारेच नेते अनुत्तीर्ण झालेले.
आंबेडकरांनी नागपूरनंतर चंद्रपूरला दीक्षा दिली. तिथेही असाच वाद सुरू आहे. स्थानिक समाजबांधव हजारोंचे मोर्चे काढून निषेध नोंदवत आहेत. तरीही वादात रममाण झालेल्यांना जाग यायला तयार नाही. क्षेत्र राजकीय असो की सामाजिक अथवा शैक्षणिक, त्यात काम करताना घराणेशाहीला स्थान नको. संस्थात्मक कामकाजाचे स्वरूप सर्वसमावेशक असायला हवे याकडे आंबेडकरांचा कटाक्ष असायचा. त्यामुळे त्यांनी काम उभारताना अनेकांना सोबत घेतले. ते करताना समोरचा मागास आहे की सवर्ण याचाही विचार केला नाही. त्यामुळेच सुरुवातीच्या काळात त्यांनी उभारलेल्या शिक्षण संस्था नावारूपाला येऊ शकल्या.
स्वार्थी व कोत्या मनोवृत्तीच्या नेत्यांमुळे आंबेडकरांचा हा विचार मागे पडला. आता या साऱ्यांमध्ये जागृत झालेली आहे ती मालकीची भावना. सार्वजनिक क्षेत्रात या भावनेने एकदा शिरकाव केला की सारे अस्ताला जाते. आज सर्वत्र तेच दिसते आहे. या नेतृत्वाने आधी तडजोडीचे राजकारण करून राजकीय क्षेत्रातील समाजाचा दबदबा संपवला. नंतर सामाजिक कार्यापासून हे नेते दूर झाले व आता शिक्षण क्षेत्रातल्या आंबेडकरी विचाराचा पराभव करायला सारे सज्ज झाले आहेत. त्यामुळे दबाव टाकण्याची व त्यासाठी स्वकीयांविरुद्ध लढा देण्याची जबाबदारी समाजावर येऊन पडली आहे. समाजाच्या कल्याणापासून फारकत घेणाऱ्या नेत्यांना वठणीवर आणण्याचे काम या समाजाने अनेकदा केले आहे. आता तीच वेळ पुन्हा आली आहे.
