नागपूर: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये नागपूर विभागाच्या निकालात २ टक्क्यांनी घट झाली नसून तो ८८.६७ टक्के लागला आहे. विभागाच्या निकाला घट झाली असली तरी नागपूर विभागाने परीक्षेमध्ये कठोर कारवाई केल्याचे दिसून येत आहे. पारदर्शक परीक्षेचा उत्तम नमूना म्हणजे शिक्षण मंडळाने तब्बल २४३ विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली आहे. उत्तर पत्रिका तपासत असताना या सर्व विद्यार्थ्यांनी एकसारखी उत्तरे लिहल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना त्या विषयात अनुत्तीर्ण करण्यात आले. नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी ही धडक कारवाई केली हे विशेष.

काय आहे नेमके प्रकरण?

गोंदिया जिल्ह्यातील माउली कनिष्ठ महाविद्यालय कोदुर्ली या शाळेमध्ये जीवशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये एकसारखी उत्तरे लिहली. या शाळेतील १२५ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. अशाच प्रकारे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील जे.डी. चौधरी शाळा वाशी येथेही असाच प्रकार घडला. येथील ११८ विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषयाचा पेपर एकसारखा लिहला. उत्तर पत्रिका तपासताना नियमकाच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर त्यांनी शिक्षण मंडळाकडे यासंदर्भात तक्रार केली. यानंतर संपूर्ण प्रक्रियेचा तपास करण्यात आला. यासाठी विद्यार्थ्यांनाही बोर्डामध्ये बोलावण्यात आले होते. त्यानंतर सर्व चौकशी केली असता सामूहिक कॉपी झाल्याचा निष्कर्ष निघाला. यामुळे शिक्षण मंडळाने एकूण २४३ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले.

शिक्षक, मुख्यध्यापक, संस्थेवरही कारवाई

या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष शिवलिंग पटवे यांनी सांगितले की, या प्रकरणात विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले असून या दोन्ही शाळेतील परीक्षा केंद्र नेहमीसाठी रद्द करण्यात आले आहे. याशिवाय या प्रकरणात कॉपी करण्यास मदत करणाऱ्या शिक्षकांवरही कठोर कारवाई होणार आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. यासोबतच शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थेवरही कारवाई केली जाणार, असेही पटवे यांनी सांगितले.

किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले

यामध्ये नागपूर विभागातून १ लाख ५३ हजार २५६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ५२ हजार २३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३४ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८८.६७ इतकी आहे. करोना काळात नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी ही ९७ टक्क्यांपर्यंत गेली होती. मात्र, चार वर्षांपासून या सवलती बंद होताच निकालात घसरण झाली आहे. नागपूर विभागनिहाय विचार केल्यास गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक असतो.