नागपूर : दिवाळी, दुर्गा पूजा आणि छठ सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरसाठी ३८ विशेष गाड्या धावणार असून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रवाशांना या गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.
मुंबई-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते नागपूरदरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडीच्या १२ फेऱ्या होणार आहेत. रेल्वे क्रमांक ०२१३९ ही गाडी १७ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरदरम्यान दर शनिवारी रात्री १२.२५ वाजता सीएसएमटीहून सुटेल. त्याच दिवशी दुपारी ३.३५ वाजता ती नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी रेल्वे क्रमांक ०२१४० ही गाडी १८ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान दर रविवारी दुपारी १.३० वाजता नागपूरहून सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता ती मुंबईत पोहोचेल.
प्रमुख स्थानकांवर थांबे
मुंबई-नागपूर विशेष गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनाही सणासुदीच्या काळात अतिरिक्त रेल्वेसेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
नागपूर-पुणे मार्गावर ४० फेऱ्या
नागपूर आणि हडपसर (पुणे) दरम्यान विशेष गाड्यांच्या ४० फेऱ्या होणार आहेत. रेल्वे क्रमांक ०१२०१/०१२०९ नागपूरहून दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सायंकाळी ७.४० वाजता सुटेल. ८ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत ही सेवा उपलब्ध असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ११.०५ वाजता गाडी हडपसरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ०१२०२/०१२१० ही गाडी हडपसरहून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी सायंकाळी ४.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. या गाड्यांना वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि कोपरगाव येथे थांबे असतील.
२७ सप्टेंबरपासून आरक्षण सुरू
रेल्वे क्रमांक ०२१३९ आणि ०१२०१ या गाड्यांचे आरक्षण २७ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. तर ०२१४० आणि ०१२०९ या परतीच्या गाड्यांसाठी २८ सप्टेंबरपासून आरक्षण सुरु झाले आहे. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर तसेच रेल्वे आरक्षण केंद्रांवर तिकिटे उपलब्ध होतील. सणासुदीच्या काळातील प्रवासी गर्दी लक्षात घेता या विशेष सेवांमुळे नियमित गाड्यांवरील भार कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे.
