नागपूर : नागपुरात डीजेवर सरसकट बंदी घालण्यात आली आहे का? गणेशोत्सवात साऊंड सिस्टिम वाजवता येणार की नाही? यावरून सुरू असलेल्या वादात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. पारंपरिक वाद्ये किंवा संगीतावर बंदी नसून, कायदेशीर मर्यादेत आवाज करणाऱ्या साऊंड सिस्टिमवरही बंदी नाही. मात्र, तीव्र आवाज आणि कंपन निर्माण करणाऱ्या काही विशिष्ट साऊंड सिस्टिमवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिसूचना कशासाठी काढली?

पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत ही अधिसूचना काढण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांना जास्तीत जास्त ६० दिवसांसाठी अशी अधिसूचना काढण्याचा अधिकार आहे. या काळात येणाऱ्या सण-उत्सवांचा त्यात उल्लेख असून, मल्टीलेअर डीजेसह लेझर आणि बीम लाईटचाही समावेश आहे.

मग डीजेवर सरसकट बंदी आहे का?

नाही. अधिसूचनेच्या शेवटच्या परिच्छेदात कायदेशीर ध्वनीमर्यादेत आवाज निर्माण करणाऱ्या साऊंड सिस्टिमवर बंदी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पारंपरिक वाद्ये आणि संगीतावरही कोणतीही बंदी नसल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले.

कारवाई नेमकी कशावर होणार?

मल्टीलेअर साऊंड सिस्टिम, प्लाझ्मा आणि प्रेशर मिड श्रेणीतील साऊंड सिस्टिमवर कारवाई केली जाणार आहे. मल्टीलेअर साऊंड सिस्टिममध्ये बेस, मिड आणि टॉप असे तीन स्तर असतात. त्यातील बेसमुळे तीव्र कंपन निर्माण होऊन शारीरिक नुकसान होऊ शकते, असे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.

निर्बंध केवळ ६० दिवसच राहणार?

सध्याची अधिसूचना ६० दिवसांसाठी असली तरी त्यानंतर तिचे शंभर टक्के नूतनीकरण केले जाईल, असे नांगरे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे अशा साऊंड सिस्टिमवरील कारवाई पुढेही सुरू राहण्याचे संकेत आहेत.

धार्मिक उत्सवांना विरोध आहे का ?

नांगरे पाटील यांनी त्यावर वैयक्तिक उदाहरण देत भूमिका स्पष्ट केली. आपण स्वतः सिद्धिविनायक आणि नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात जातो तसेच दिवसाची सुरुवात गणपती स्तोत्राने करतो, असे त्यांनी सांगितले. उत्सव किंवा संगीताला बंदी नसून, मर्यादेपलीकडे ध्वनिप्रदूषण करणाऱ्या यंत्रणांवरच निर्बंध आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.