Nagpur Ganeshotsav DJ Ban: पुण्यात डीजेच्या दणदणाटाविरोधात नागरिकांची चळवळ जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर ठाम भूमिका घेण्याऐवजी पुणेकरांनी आपल्या संस्कृतीनुसार गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. नागपुरात मात्र त्यांच्याच गृहखात्याच्या अखत्यारीतील पोलिसांनी थेट नोव्हेंबरपर्यंत डीजेवर बंदी घातली. विशेष म्हणजे, नागपुरात या बंदीची मागणी करणारी कोणतीही मोठी लोकचळवळ उभी राहिलेली नसताना हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नाबरोबरच या निर्णयामागील राजकीय गणिताचीही चर्चा सुरू झाली आहे.
नागपूर हे उत्सवप्रिय शहर. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, मिरवणुका यामध्ये डीजे आणि तत्सम ध्वनिवर्धकांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा त्रास हा नागपूरसाठी नवा नाही. उलट, पुण्याच्या तुलनेत नागपुरातील डीजेचा दणदणाट कमी आहे, असेही म्हणता येणार नाही. मात्र, या प्रश्नावर नागरिकांकडून सातत्याने आवाज उठविला गेला असला तरी सत्ताधाऱ्यांकडून त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. उत्सव साजरा करणारा मोठा वर्ग हिंदू आणि त्या वर्गाच्या भावनांचे राजकीय प्रतिनिधित्व करण्याचा दावा भाजपकडून केला जात असल्याने डीजेवरील कारवाई हा नेहमीच संवेदनशील विषय राहिला आहे. त्यामुळेच ध्वनिप्रदूषणाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ नागरिकांवर आली. सणासुदीच्या काळात डीजेच्या दणदणाटाला मिळणाऱ्या राजकीय पाठबळामुळे या प्रश्नावरील नागपुरातील विरोधाला अपेक्षित धार आली नाही, हा त्यामागचा एक पैलू. पुण्यात मात्र एका सामान्य नागरिकाने डीजेविरोधात भूमिका घेतल्यानंतर हा प्रश्न शहराचा प्रश्न बनला. त्यात विरोधकांनी उडी घेतल्याने सरकारवर भूमिका घेण्याचा दबाव निर्माण झाला.
याच पार्श्वभूमीवर पुण्यात मुख्यमंत्र्यांनी डीजेच्या प्रश्नावर थेट बंदीची घोषणा न करता ‘पारंपरिक पद्धतीने’ गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. नागपुरात मात्र पोलिसांनी कोणतीही मोठी लोकचळवळ उभी राहण्यापूर्वीच नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदी लागू केली. मात्र, नागपुरातील बंदीची घोषणा होण्याच्या आधी आणि त्यानंतर अवघ्या काही तासांत घडलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेतल्या तर या निर्णयामागील राजकीय गणित अधिक स्पष्ट होते.
एका दिवसात घटनांची मालिकाच
बुधवारी सायंकाळी भाजपचे माजी आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संदीप जोशी यांनी डीजेविरोधात लोकचळवळ उभारण्याची घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस आयुक्तांनी नागपुरात नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदी लागू केली.बंदीच्या निर्णयानंतर त्याचे समर्थन करण्यासाठी जोशी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याच सुमारास भाजपचे विद्यमान आमदार प्रवीण दटके यांनी समाजमाध्यमावर डीजे बंदीला विरोध करणारी भूमिका मांडली. त्यानंतर काहीच तासांनी भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनीही प्रसिद्धीपत्रक काढून सरसकट डीजे बंदीला विरोध दर्शविला.
या घटनाक्रमाकडे वरवर पाहता भाजपमध्येच डीजेबंदीवरून मतभेद निर्माण झाल्याचे चित्र दिसते. मात्र, राजकीयदृष्ट्या विचार केला तर हे मतभेद आहेत की पक्षातील वेगवेगळ्या सामाजिक घटकांना साधण्याचा प्रयत्न, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो.
‘बंदी’ही आपली, ‘विरोध’ही आपलाच!
नागपुरातील भाजपच्या राजकीय सामाजिक समीकरणाचा विचार करता या निर्णयाचा एक विशिष्ट वर्गाला फायदा होऊ शकतो. दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील मोठा मध्यमवर्गीय आणि ध्वनिप्रदूषणाला विरोध करणारा वर्ग डीजे बंदीच्या निर्णयाचे स्वागत करू शकतो. या वर्गात भाजपचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे बंदीचा राजकीय लाभ भाजपला मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, जुन्या नागपुरातील अनेक पारंपरिक गणेश मंडळे डीजेवरील निर्बंधांना विरोध करण्याची शक्यता आहे. यातील काही मंडळांचे भाजपच्या स्थानिक नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्यातच विश्व हिंदू परिषदेसह काही हिंदुत्ववादी संघटना डीजेबंदीविरोधात मैदानात उतरण्याची शक्यता कायम आहे. या वर्गाला नाराज करणे भाजपला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळेच एका बाजूला डीजे बंदीचा निर्णय घेऊन ध्वनिप्रदूषणविरोधी वर्गाला संदेश द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला पक्षातीलच काही नेत्यांकडून बंदीला विरोध करून गणेश मंडळे आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या नाराजीला वाट करून द्यायची यातून एकाच वेळी दोन्ही बाजू सांभाळण्याचे राजकारण दिसते.
राजकारणात एखादा प्रश्न केवळ सोडवणे महत्त्वाचे नसते; त्या प्रश्नाचे राजकीय श्रेय कोण घेते आणि त्यावरचा असंतोष कोणाच्या विरोधात वळतो, हेही महत्त्वाचे असते. नागपुरातील डीजेबंदीच्या निमित्ताने भाजपने हे दोन्ही गणित साधण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तरी डीजेबंदीचे श्रेय भाजपकडे आणि डीजेबंदीविरोधातील ‘आवाज’ही भाजपचाच! अशा परिस्थितीत विरोधकांना या मुद्द्यावर स्वतंत्र राजकीय अवकाश मिळण्याची शक्यताच नाही. नागपुरातील डीजेबंदीच्या निर्णयामागील राजकीय गणित याच ठिकाणी दडलेले आहे.
