scorecardresearch

झटपट ‘टाय’ बांधण्याचा डॉ. शर्मा यांचा विक्रम

नागपुरातील डॉ. दीपक शर्मा यांनी केवळ १२.८९ सेकंदात ‘विंडसर नॉट’ (दोन गाठी असलेली टाय) ‘टाय’ बांधला.

tie-bow
प्रतिनिधिक छायाचित्र

गिनिज बुकमध्ये नोंद होण्याची शक्यता

‘टाय’ बांधणे ही एक कला असते, परंतु घाईगडबडीत अनेकदा त्याची गाठ बांधणे शक्य होत नाही, पण आज नागपुरातील डॉ. दीपक शर्मा यांनी केवळ १२.८९ सेकंदात ‘विंडसर नॉट’ (दोन गाठी असलेली टाय) ‘टाय’ बांधला. कमी वेळेत ‘टाय’ बांधण्याचा विक्रम सध्या १२.९१ सेकंदाचा आहे. त्यापेक्षा कमी वेळेत शर्मा यांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांच्या नावाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होण्याची शक्यता आहे.

छंद वैभवच्या वतीने दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या खुल्या व्यासपीठावर रविवारी सर्वाधिक वेगाने ‘विंडसर नॉट’  बांधण्याचा विश्वविक्रम मोडण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डॉ. दीपक शर्मा यांनी पहिल्यांच प्रयत्नात १२.८९ सेकंदात ही प्रक्रिया पूर्ण करून नवा विक्रम केला आहे, परंतु याची नोंद गिनिज बुकमध्ये होण्यासाठी काही औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतरच त्या विक्रमाची नोंद होईल किंवा नाही, ते कळू शकणार आहे. १२.९१ सेकंदात ‘विंडसर नॉट’ बांधण्याच्या विक्रमाची नोंद न्यूझीलँडचे अ‍ॅलास्टेअर गॅल्पिन यांच्या नावावर आहे. तो त्यांनी २७ ऑगस्ट २०१२ मध्ये केला होता हे येथे उल्लेखनीय.

डॉ. शर्मा यांनी आज सहा प्रकारचे रिकॉर्ड केले. एका सेकंदात साडेपाच ‘टाय’ बांधण्याचा, त्यानंतर वेगवान टाय बांधण्याचा विक्रम केला. त्यांनी आज ५.४३ सेकंदात टाय बांधली. त्यांनी आपलाच विक्रम मोडला. याापूर्वी त्यांनी ५.८१ सकेंदात टाय बांधली होती. शर्मा यांनी एक गाठ पाडून बांधलेली टाय प्रकारात देखील विक्रम नोंदवला. त्यांनी ५.९१ सेकंदात ‘सिंगल नॉट’ टाय बांधली. आधीचा विक्रम ६.८३ सेकंदाचा होता. त्यानंतर आणखी एक विक्रम त्यांनी केला. तो म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून टाय बांधण्याचा. त्यांनी १४.८६ सेकंदात ही प्रक्रिया पूर्ण केली. तसेच डोळ्याला पट्टी बांधून टेबलावर केवळ ५.१४ सेकंदात टाय बांधून दाखवली. आधीचा विक्रम ९.५७ सेकंदाचा आहे. सर्वात शेवटी त्यांनी गिनिज बुक ऑफ रिकॉर्ड, एशिया बुक रिकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड अमेजिंग, लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी सर्वात वेगवान ‘विंडसर नॉट’ टाय बांधण्याचा विक्रम केला. यावेळी पंच म्हणून १०५ तास सलग गाणे गावून विक्रम करणारे सुनील वाघमारे आणि पोलीस अधिकारी कैलाश तामकर हे होते. संचालन आरजे अमित यांनी केले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-10-2017 at 03:08 IST