नागपूर : शहरातल्या मध्यवर्ती भागात शिवाजी नगरात माहेश्वरी समाजातील सुखवस्तू कुटुंब. कर्ता पुरुष पवन मूंदडा यांचा स्वत:चा व्यवसाय. आई मानसोपचार समुपदेशक. मात्र कुटुंबातील थोरल्या मुलीने करीअरची वेगळी वाट धरली. अपार कष्ट करत तिने मुंबईतून वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदवी शिक्षण घेतले. दुसऱ्याच वर्षी शल्यक्रियेत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सांगली गाठले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि या हसत्या खेळत्या कुटुंबावर बुधवारी काळाचा घाला पडला.
शिवाजी नगर येथील पवन मूंदडा मुलगी असलेली खुशी (२५) यांना खुशी, पार्थ आणि पुर्वा अशी तीन अपत्ये. त्यापैकी तिन्ही भावंडात सर्वांत थोरली असलेल्या खुशीने २०२४ मध्ये मुंबईतल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. शल्यक्रिया विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवत दुसऱ्याच वर्षी तीने सांगलीतल्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये पदव्यूत्तर शाखेत प्रवेशही घेतला.
नेमकं काय घडलं सांगलीत?
नियमीतपणे निवासी डॉक्टर म्हणून सेवा देत असताना बुधवारी रात्री अडिचच्या सुमारास खुशी ही रोजचे रुग्णसेवेचे कर्तव्य पूर्ण करून दुचाकीने घरी निघाली होती. वाटेत दबा धरून बसलेल्या काळाने तिच्यावर झडप घातली. पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने तिला चाकाखाली चिरडत पळ काढला.
हेही वाचा
कारने धडक दिली आणि सगळं संपलं
सांगलीत राहून शिक्षण घेणारी खुशी ही डॉक्टर तरुणी घरी परतत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने चाकाखाली चिरडत तिचा जीव घेतला. खुशी पवन मुंदडा (२५) असे अपघातात अकाली दगावलेल्या या उदयोन्मुख भावी डॉक्टर तरुणीचे नाव आहे. पदव्युत्तर शिक्षणानंतर नागपुरात सेवा सुरू करण्याचे स्वप्न उराशी कवटाळूनच खुशीने बुधवारी अखेरचा श्वास घेतला.
मुंदडा कुटुंब दुःखात
दुसऱ्या दुचाकीवरील सोबतच्या निवासी डॉक्टरने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान खुशीने अखेरचा श्वास घेतला. ध्यानी मनी नसल्याने काळाने असा अचानक घात केल्याने मुंदडा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शवविच्छेदनाचा सोपस्कार केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी तिचा मृतदेह नागपुरात आणण्यात आला. शुक्रवारी अंबाझरी घाटावर तिच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
