नागपूर : नागपुरातील लता मंगेशकर रुग्णालयात अँजिओग्राफी सुरू असतानाच ५८ वर्षीय रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे हृदय बंद पडले. तातडीने हृदयाला पुनर्जीवित करत डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची रक्तवाहिनी विस्तार उपचारपद्धती यशस्वीपणे पूर्ण केली. मुख्य हृदयधमनीतील शंभर टक्के अडथळा आणि फुगवटा दूर करून रुग्णाला नवजीवन मिळाले.

अँजिओग्राफीदरम्यान नेमके काय घडले?

अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील मेहंद्री येथील ५८ वर्षीय रूपरावजी वांदेशकर यांना छातीत तीव्र वेदना आणि हृदयविकाराचा त्रास होत असल्याने नागपुरातील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची अँजिओग्राफी सुरू असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि उपचाराच्या टेबलवरच त्यांचे हृदय बंद पडले.

डॉक्टरांनी त्यानंतर काय केले?

रुग्णाचे हृदय बंद पडताच डॉक्टरांनी तातडीने हृदयाला पुनर्जीवित करण्याची प्रक्रिया सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर रुग्णाचे हृदय पुन्हा सुरू करण्यात डॉक्टरांना यश आले. त्यानंतर तातडीने पुढील उपचार सुरू करण्यात आले.

तपासणीत काय निष्पन्न झाले?

अँजिओग्राफीमध्ये हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये शंभर टक्के अडथळा असल्याचे दिसून आले. त्याच रक्तवाहिनीत फुगवटाही असल्याचे स्पष्ट झाले. ही स्थिती अत्यंत गंभीर आणि जीवघेणी मानली जाते.

सामान्यतः अशा रुग्णांवर कोणते उपचार केले जातात?

अशा परिस्थितीत सामान्यतः हृदयाची बायपास शस्त्रक्रिया हा अधिक योग्य पर्याय मानला जातो. मात्र, रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका आलेला आणि हृदय बंद पडलेले असल्याने वेळेअभावी ही शस्त्रक्रिया करणे धोकादायक ठरले असते.

मग डॉक्टरांनी कोणता निर्णय घेतला?

रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन रुग्णालयातील हृदयरोग विभागाच्या पथकाने रक्तवाहिनी विस्तार उपचारपद्धतीच करण्याचा निर्णय घेतला. विशेष प्रकारच्या आधारयुक्त जाळीच्या साहाय्याने मुख्य रक्तवाहिनीतील अडथळा दूर करण्यात आला. तसेच रक्तवाहिनीतील फुगवटाही यशस्वीपणे बंद करण्यात आला.

उपचार कोणी केले?

हृदयरोग विभागप्रमुख डॉ. हितेंद्र भागवतकर यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ हृदय तंत्रज्ञ अश्विन सावरकर आणि संपूर्ण हृदयरोग पथकाने अत्यंत कौशल्याने ही उपचारप्रक्रिया पूर्ण केली.

रुग्णाची प्रकृती आता कशी आहे?

उपचार पूर्णपणे यशस्वी ठरले असून रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सध्या ते पूर्णपणे निरोगी असून पूर्वीप्रमाणे दैनंदिन जीवन जगत आहेत.

उपचाराचा खर्च कसा झाला?

या रुग्णावर आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले.

डॉक्टरांनी काय सांगितले?

डॉ. हितेंद्र भागवतकर यांनी सांगितले की, मुख्य हृदयधमनीतील गंभीर अडथळा आणि फुगवटा यामुळे हे प्रकरण अत्यंत आव्हानात्मक होते. हृदय बंद पडल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात यश आले. त्यानंतर अत्यल्प वेळेत योग्य नियोजन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार करण्यात आले. हा यशस्वी उपचार संपूर्ण पथकाचा अनुभव, समन्वय आणि अत्याधुनिक सुविधांमुळे शक्य झाला.

डॉक्टरांचे कौतुक

या यशस्वी उपचाराबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष आमदार डॉ. आशिषराव देशमुख, अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवस्थळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनुज तिवारी यांनी डॉ. हितेंद्र भागवतकर आणि संपूर्ण हृदयरोग पथकाचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.