नागपूर : देशसेवा ही केवळ उपजीविकेची वाट नसते, ती मनात रुजलेली एक अखंड साधना, उराशी बाळगलेला ध्यास असताे. अवघ्या दीड वर्षाची मुलगी पदरात असताना मुसुरीच्या आयटीबीपी अकॅडमीतील अत्यंत खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून डॉ. युगंधरा भोंडे यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडन्ट मेडिकल ऑफिसर म्हणून क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाली.

डॉ. युगंधराची गाथा

मूळ नागपूरकर डॉ. युगंधरा भोंडे यांची कहाणी ही अशाच एका असामान्य ध्यासाची गाथा आहे. वैद्यकीय क्षेत्रातून रुग्णसेवा करणाऱ्या या डॉक्टर तरुणीने जेव्हा गणवेश परिधान करून देशसेवेचा संकल्प केला, तेव्हा तिच्यासमोर केवळ कठोर प्रशिक्षणाचे आव्हान नव्हते, तर एका आईच्या ममतेचीही कठीण परीक्षा होती. एका बाजूला अवघ्या दीड वर्षांची चिमुकली लेक आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रसेवेचे कर्तव्य. या दोन टोकांमध्ये उभे राहून जिद्द, कठोर मेहनत आणि कमालीच्या दृढनिश्चयाच्या जोरावर तिने घेतलेला निर्णय तिच्या धैर्याची आणि समर्पणाची साक्ष देणारा ठरला. मुसुरीच्या आयटीबीपी अकॅडमीतील अत्यंत खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून एक प्रेरणादायी कहाणीचे एक वर्तृळ पूर्ण केले.

मुलगी अवघे दीड वर्षांची

पुण्याची डॉक्टर तरुणी युगंधरा भोंडे यांनी आपल्या अथक परिश्रमाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात क्लास वन ऑफिसरची पोस्ट मिळवली. ज्यावेळी युगंधरा यांनी CAPF MOSB ची परीक्षा उत्तीर्ण केली. तेव्हा त्यांची मुलगी मीरा अवघी दीड वर्षांची होती. खरं तर, डॉ. युगंधरा या दिवंगत प्रा. हरिदास आणि संध्या भोंडे यांची कन्या. घरातूनच समाजसेवेचा समृद्ध वारसा त्यांना मिळाला होता. अमरावतीच्या पीडीएमसी महाविद्यालयातून त्यांनी आपलं एमबीबीएसचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाहबंधनात अडकलेल्या युगंधरा यांनी पुढे दिल्लीच्या प्रतिष्ठित एम्समध्येही काम केलं.

जोडीदारही फोर्सेसमध्ये

युगंधरा यांचा जोडीदार प्रतीक सोनारे हे देखील युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आधीच फोर्सेसमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत. पतीची देशसेवा आणि त्यांचं समर्पण युगंधरा यांच्यासाठी एक मोठी प्रेरणा ठरली. फोर्सेसमध्ये केवळ लढवय्या जवानांचीच नव्हे, तर सैनिकांचे प्राण वाचवणाऱ्या खंबीर डॉक्टरांचीही तेवढीच गरज असते, हे ओळखून युगंधरा यांनीही पतीच्याच मार्गावर चालण्याचा धाडसी निर्णय घेतला.

घनदाट जंगलात वास्तव्य

याच नियमाला अनुसरून हे सहा महिन्यांचे प्रशिक्षण अतिशय खडतर होते. अश्यावेळी ​नुसते वैद्यकीय ज्ञान पुरेसे नव्हते, तर प्रसंगी हातात बंदूक घेऊन शत्रूचा सामना करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे लागले. घनदाट जंगलात वास्तव्य करणे, सलग तीन-तीन दिवस केवळ एक लिटर पाण्यावर तग धरून राहणे, आणि मुसुरीच्या अवघड डोंगर-दऱ्यांमधून मार्गक्रमण करणे हा या प्रशिक्षणाचा भाग होता. सोबतीला हाडे गोठवणारी थंडी होतीच. परंतु या सर्व प्रतिकूल वातावरणावर मात करत युगंधरा यांनी हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.

कुटुंबियांची भक्कम साथ

मुसुरीच्या जंगलातील थंडी आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य यापेक्षाही एक मोठे आणि अत्यंत कठीण आव्हान डॉ. युगंधरा यांच्यासमोर होतं आणि ते म्हणजे आपल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकल्या लेकीपासून इतके महिने दूर राहणे. एका आईसाठी आपल्या तान्ह्या बाळाला सोडून देशसेवेचे व्रत घेणे, हे एखाद्या तपश्चर्येपेक्षा कमी नव्हतं. ​परंतु, या भावनिक संघर्षाच्या काळात त्यांच्या पाठीशी त्यांचे सासू-सासरे डॉ. सरोज आणि डॉ. चंद्रकांत सोनारे हे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी नातीला मायेची ऊब दिली, ज्यामुळे युगंधरा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकल्या. जोडीला पती प्रतीक यांचा अभेद्य पाठिंबा होताच. कुटुंबाच्या याच भक्कम साथीमुळे मातृत्वाची कसोटी देताना त्यांच्यातील कर्तृत्ववान अधिकारी कुठेही कमी पडला नाही.